आपत्कालीन काळात अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपला मोबाईल फोन बंद करून ठेवू नये

0
33

आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या सूचना, महापालिकेच्यावतीने आपत्कालीन व्यवस्थापन उपाययोजनांबाबत बैठक 

नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक व आपत्ती व्यवस्थापन यावर विविध उपयोजना करण्यासंदर्भात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बैठक घेऊन अधिकारी यांना विविध सूचना देत सांगितले की, कुठल्याही कर्मचारी अधिकार्‍याने या काळामध्ये सुट्टीवर जाऊ नये, तसेच अधिकारी कर्मचारी यांनी आपला मोबाईल फोन बंद करू नये, जेणेकरून शहरातील नागरिकांना आपत्कालीन मदत तातडीने आपल्याला देता येईल. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंढे, लक्ष्मीकांत सताळकर, श्रीकांत पवार, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, इंजिनीयर श्रीकांत निंबाळकर, डॉ. अनिल बोरगे, शंकर मिसाळ, शशिकांत नजन, नाना गोसावी, राम चारठाणकर आदी उपस्थित होते. आपत्कालीन परिस्थीती निर्माण होणारी विविध ठिकाणे शोधुन त्या ठिकाणी असणारा कचरा, प्लास्टीक व इतर साहित्य हटवावे तसेच पाईपचे अग्रभागी असणारे मटेरियल हटवुन प्रवाह मोकळा होण्यासाठी घनकचरा विभागाने कार्यवाही करावी. विविध उपाययोजनाव्दारे पाण्याचा प्रवाह किंवा इतर आपत्तीबाबत उदाहरणार्थ घनकचरा व इतर सर्व विभागाने कार्यवाही करावी. घनकचरा विभागामार्फत छोटया नाल्या सफाई कामी चार प्रभागनिहाय कामाचे कोटेशन मागविण्यात येवुन काम सुरु करण्यात यावे. पाणी पुरवठा विभागामार्फत पाईपलाईन लिकेजेस काढण्यात यावीत.

तसेच पाणी शुध्दीकरणासाठी आवश्यक तो कलोरीन साठा, ब्लिचींग साठा तयार ठेवावा. नागरी हिवताप योजनेमार्फत पाणी साठणारी ठिकाणी डासोत्पती टाळण्यासाठी औषध फवारणी करणे तसेच नागरी भागात धुर फवारणीचे नियोजन करण्यात यावे. आवश्यकता असल्यास बाहय यंत्रणेमार्फत कर्मचारी उपलब्ध करुन घेण्याची तात्काळ कार्यवाही करावी. आवश्यक तो औषध साठा मनपा आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध ठेवावा. डेंगूसदृश्य आजाराबाबत जनजागृती करावी, घनकचरा विभागाने कचर्‍याचे ढिग तात्काळ उचलण्याची कार्यवाही करणेबाबत संबधीतांना आदेश निर्गमीत करावेत. स्वच्छता निरीक्षक यांनी दोन दिवसात पाहणी करुन नालीवरील चेंबर झाकणाची यादी सां. बां. विभागाकडे सादर करावी. इलेट्रिक विभागामार्फत स्ट्रीट लाईट नियमीत चालु राहणेकामी आवश्यक ती कार्यवाही करावी. नागरीकांच्या दक्षतेसाठी सीना नदी काठी आवश्यक त्या ठिकाणी बॅरेकेटस, बॅनर, फ्लेस लावण्याची कार्यवाही बांधकाम विभागाने करावी. अग्नीशमन विभाग, प्रभाग अधिकारी यांनी आपत्कालीन यंत्रणा सर्व साधन सामग्री व कर्मचारी यांच्यासह सतर्क ठेवावी. बांधकाम विभागाने शहरातील धोकादायक इमारतींना नोटीस देणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. धोकादायक इमारतीचे ठिकाणी बॅनर लावण्यात यावे. अग्नीशमन विभागाने फायर ऑडीट व इलेट्रिक इन्स्पेशन करुन घेणेकामी नोटीस देण्यात याव्यात. जाहिर प्रकटन वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात यावे, उद्यान विभागामार्फत धोकेदायक झाडाच्या फांद्या छाटणे, तसेच पावसाने पडलेल्या वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या फांद्या उचलणेसाठी आवश्यक ती यंत्रणा तयार ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे निवार्‍याचे व्यवस्थेसाठी मनपा शाळा खोल्याच्या चाव्या प्रभाग अधिकारी यांनी ताब्यात ठेवाव्यात. नागरिकाचे स्थलांतरासाठी आवश्यक ती वाहन व्यवस्थाकामी पुर्व तयारी करावी. याबाबतचा वाहतूक आराखडा मोटरव्हेईकल विभाग प्रमुख यांनी करावा.

खाजगी वाहनचालकांचे फोन नंबर, जे.सी.बी चालकांचे फोन नंबर संकलीत करुन ठेवावेत, आपत्कालीन कक्ष स्थापन करुन २४ तास कार्यरत ठेवण्यासाठी आस्थापना विभागाने कर्मचारी नियुक्त करावे. यावर नियंत्रण अधिकारी म्हणुन उपायुक्त (सा) यांनी काम पहावे. सार्वजनिक सुटीच्या दिवशी उपायुक्त यांनी मनपा कार्यक्षेत्रात उपस्थित रहावे. सार्वजनिक बांधकाम विभाग, घनकचरा यांच्या पावसाळी गटारी साफसफाई बाबत पत्रव्यवहार करुन पुर्तता करुन घेणे बाबत शहर अभियंता यांनी जबाबदारी पार पाडावी. पावसाळी गटार सफाई करणे, मनपा सर्व आरोग्य केंद्रात आवश्यक तो औषधसाठा पुरेशा प्रमाणात ठेवण्याची कार्यवाही वैदयकीय आरोग्य अधिकारी यांनी करावी. अग्नीशमन विभागामार्फत डी-वॉटरींग पंप इंधनासह चार झोनसाठी उपलब्ध करुन द्यावे उपरोक्त सर्व यंत्रणामध्ये अग्नीशमन विभाग प्रमुख यांनी समन्वय म्हणुन जबाबदारी पार पाडावी. आपत्कालीन यंत्रणेच (मोबाईल) संपर्क क्रमांक जाहिर प्रसिध्दी विविध सोशल मिडीयावर व दर्शनी भागात प्रसिध्दी करावेत. याबाबत वर्तमान पत्रात बातमी देण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीत विनापरवाना गैरहजर राहु नये, सर्व कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर साप्ताहिक आढावा घ्यावा. अशा सूचना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बैठकीत दिल्या.