एस टी बसच्या वाहक, चालकाला मारहाण करत काचा फोडल्या

0
81

आरोपीला जमावाने दिला चोप; गुन्हा दाखल

नगर – पाथर्डी रोडवर भिंगार जवळील हॉटेल मंथन समोर एकाने मद्य प्राशन करून भरधाव वेगात वाहन चालवून एस टी बस ला धडक दिली. त्यानंतर चालक, वाहकाला मारहाण करत दगड फेकून बस च्या काचा फोडण्याची घटना सोमवारी (दि.२०) रात्री ८.३० च्या सुमारास घडली. या घटनेनंतर तेथे गोळा झालेल्या जमावाने दारूच्या नशेत असलेल्या आरोपीला चांगलाच चोप दिला. याबाबत बसचालक दादासाहेब लक्ष्मण जाधव (वय ३८, रा. अंबड, जि. जालना) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे अंबड आगाराची बस (क्र. एमएच १४, बीटी २२८९) घेवून नगरकडून जालन्याकडे पाथर्डी रोड ने जात असताना हॉटेल मंथन समोर आरोपी अमोल प्रकाश गुंड (रा. प्रकाश हॉटेलच्या पाठीमागे, भिंगार) हा दारूच्या नशेत भरधाव वेगात चारचाकी वाहन चालवत आला आणि त्याने बस ला धडक दिली.

तसेच बस चालक दादासाहेब जाधव व वाहक गोविंद चौघुले या दोघांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वाहक चौघुले यांच्या हातातील तिकीट मशीन व मोबाईल रस्त्यावर आदळून फोडला. बस च्या पुढील बाजूची काच दगड फेकून मारत फोडली. या झटापटीत वाहक चौघुले यांच्या जवळील प्रवाशांच्या तिकिटाचे जमा झालेले १८ हजार २३५ रुपये कुठे तरी पडून गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी अमोल गुंड याच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३, २७९,३३२, ३२३, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.