जनरेटरसह पिकअप लुटणाऱ्या टोळीतील चार आरोपी जेरबंद

0
31

१२ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी केला हस्तगत

नगर – चाकण, म्हाळुंगे एमआयडीसी येथुन किर्लोस्कर कंपनीचे जनरेटर भरून नांदेड येथे घेऊन जात असताना नगर पुणे महामार्गावर चास गावाच्या शिवारात जनरेटरसह पिकअप लुटणार्‍या टोळीतील चार आरोपींना नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून १२ लाख ७२ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील वाकड, ता. मुळशी येथील वाहनचालक अमोल उध्दव साठे हे दि.२९ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास चाकण, म्हाळुंगे एमआयडीसी येथुन किलोस्कर कंपनीचे जनरेटर मशिन पिकअप मध्ये भरून घेऊन नांदेड येथे देण्यासाठी जात असताना दि. ३० मार्च रोजी पहाटे २ च्या सुमारास पुणे ते नगर रोडवर चास गावचे शिवारातील गुरु हॉटेलचे जवळ पिकअप समोर एक पांढरे रंगाची कार अचानक आली व त्यामधुन चार इसम खाली उतरुन ते जवळ येऊन साठे यांना गाडीचे खाली उतरवुन लाथाबुयांनी मारहाण करून त्या चार अनोळखी इसमांनी पिकअप गाडी व त्यामधील जनरेटर बळजबरीने पळून घेऊन फरार झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पथकासह घटनास्थळी बारकाईने पाहणी करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तपासाबाबत योग्य ते मार्गदर्शन करत गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

स.पो.नि.गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, पोलीस कर्मचारी दिनकर घोरपडे, सुभाष थोरात, धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, कमलेश पाथरुट, राजू खेडकर, सागर मिसाळ, मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांनी सदर घटनास्थळ ते नगर पुणे महामार्गावर शिरूर पर्यंत तसेच नगर शहरालगत केडगाव पर्यंत बारकाईने तपास करत असताना काही हॉटेल मधल्या सीसीटीव्ही मध्ये एक संशयित कार या ठिकाणावरून त्या ठिकाणी जात येत असल्याचे दिसले. पोलीस पथकाने संबंधित रेकॉर्डचा बारकाईने तपास करून संशयित चार चाकी वाहन निष्पन्न करून तपासाला दिशा मिळाली होती त्यानुसार कार मालकाचा शोध घेतला. त्यानंतर हा गुन्हा वैभव प्रदीप औटी (रा.पारनेर), देवदत्त उर्फ देवा जंबे (रा.म्हसणे, ता. पारनेर), अतुल तरटे (रा.म्हसणे, ता. पारनेर), सुमित दिवटे (रा. रूई छत्रपती ता. पारनेर) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्या चौघांना पथकाने शिताफीने पकडले. अधिक तपासात त्यांच्या कडून टाटा कंपनीची इंट्रा व्ही ३० मॉडेलची पिकअपहा खोलून सुटे पार्ट केलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच किलोस्कर कंपनीचे जनरेटर, गुन्हयात वापरलेली चार चाकी गाडी असा १२ लाख ७२ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.