नगर शहरात ३० मे रोजी जिल्हास्तरीय धम्म परिषद

0
58

सोमवारपासून दहा दिवसीय श्रामणेर विधीकर्ता शिबिराला होणार प्रारंभ 

नगर – अहमदनगर जिल्हा भिखू संघ, तथागत बुद्धिस्ट सोसायटी (इंडिया) व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात दहा दिवसीय निशुल्क श्रामणेर विधीकर्ता शिबिर व जिल्हास्तरीय पहिली भूमिपुत्र धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.२० मे) नवीन टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे श्रामणेर विधीकर्ता शिबिराला प्रारंभ होणार आहे. तर ३० मे रोजी नंदवन लॉन्स येथे धम्म परिषद होणार असल्याची माहिती संजय कांबळे, रमेश पगारे व शिवाजी भोसले यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या सम्यक सामाजिक आणि धार्मिक क्रांती अभियानाला गती देण्यासाठी व तथागत सम्यक संबुध्द यांनी उपदेशित केलेल्या धम्माला जाणण्यासाठी दहा दिवसीय श्रामनेर धम्म प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. २० ते ३० मे दरम्यान होणार्‍या दहा दिवसीय श्रामणेर विधीकर्ता शिबिरात बौध्द भिखू मार्गदर्शन करणार आहेत. महिला उपासिकांसाठी दुपारी २ ते ४ ही स्वतंत्र वेळ ठेवण्यात आली आहे.

३० मे रोजी श्रामणेर विधीकर्ता शिबिराचा समारोप होऊन जिल्हास्तरीय धम्मपरिषद पार पडणार आहे. सकाळी ध्वजारोहण व परिसरातून धम्म रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेच्या उद्घाटन सत्रात सत्येंद्र तेलतुंबडे, दुसर्‍या सत्रात प्रा. डॉ. विलास खरात व तिसर्‍या समारोपीय सत्रात भिखू शायपुत्र राहुल पैठण मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमातून अखिल मानव जातीचे दुःख मुक्त करणारे तथागत सम्यक संबुद्ध यांचा सद धम्म जाणून घेण्याची संधी उपलब्ध होणार असून याचा लाभ घेण्याचे व धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संजय कांबळे ९९७०७७५५२२, रमेश पगारे ९४२२७९७७५५ व शिवाजी भोसले ९३७२४४३७०५.