शहर उपनगरातील ओढे व नाल्याची पावसाळयापूर्वी साफसफाई करावी

0
26

माजी उपमहापौर गणेश भोसले यांची महापालिका आयुक्तांना निवेदनातून मागणी

नगर – पावसाळयापूर्वी महानगरपालिकेच्या हद्दीमधील ओढे व नाल्यांची साफ सफाई होणे गरजेचे असताना देखील अदयापपर्यंत त्याची सुरूवात करण्यात आलेली नाही. मागील पावसाळ्यातील घटनांचा अनुभव घेता साफसफाई होणे आवश्यक आहे अन्यथा मागील घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते, यात मोठ्या प्रमाणात काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात अक्षरशः पाण्याचे तळे साचल्याचे पाहायला मिळाले होते त्यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान मनपाच्या बेजबाबदारपणामुळे झाले होते, हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची मनपाने खबरदारी घ्यावी, तसेच सध्या अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात गारपीट व पाऊस झाल्यास ओढे व नाले साफसफाई केलेली नसल्याने नागरीकांच्या घरामध्ये पाणी घुसून आर्थीक व जीवीत हानी होण्याची शयता नाकारता येत नाही. महानगरपालिकेने जानेवारी / फेब्रुवारी महिन्यातच सदरील कामाची निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. यामुळे एप्रिल महिन्यात ओढे व नाले साफसफाईच्या कामाची सुरूवात होवून १५ मे पर्यत काम पुर्ण करणे गरजेचे होते. परंतु कामास सुरूवात झालेली नाही. सध्याचा अवकाळी पाऊस व पुढील महिन्यापासुन सुरू होणारा पावसाळा विचारात घेवून पावसाळ्यात नागरीकांची गैरसोय होवू नये यासाठी तातडीने ओढे व नाले साफसफाईच्या कामास सुरूवात करण्यात यावी अशी मागणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनातून केली.