कावीळ – ब विरोधी लस कोणी घ्यावी?
मध्यंतरी कावीळ- ब प्रतिबंधक लसीकरणाच्या शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी त्या लसी घेतल्या. पण खरेच सर्वांनी त्या लसी घेण्याची गरज होती का? कावीळीत डोळे, त्वचा, लघवी पिवळी होतात. भारतात विषाणूंमुळे होणारी कावीळ अर्थात शास्त्रीय भाषेत यकृतदाह मुख्यत्वे आढळून येतो. ‘अ’ प्रकारची कावीळ दूषित पाणी-अन्नातून पसरते. ‘ब’ प्रकारची कावीळ दूषित रक्त, तसेच शरीरातील वीर्य, योनीस्राव आदी स्रावांपासून पसरते. साहजिकच ‘अ’ प्रकारची कावीळ कोणालाही होऊ शकते; पण ‘ब’ प्रकारची कावीळ मात्र रक्त व शरीरातील इतर स्रावांशी संपर्क येऊ शकणार्या व्यक्तींनाच होऊ शकते. यात वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, प्रयोगशाळेत काम करणारे तंत्रज्ञ, समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, शिरेवाटे मादक पदार्थ घेणारी व्यक्ती, वारंवार रक्त घ्याव्या लागणार्या व्यक्ती तसेच वेश्या आदींचा समावेश होतो. साहजिकच या व्यक्तींनी कावीळ ‘ब’ विरोधी लस घ्यायलाच हवी. या लसीचा डोस प्रौढ व्यक्तींसाठी १ मिली, तर मुलांसाठी ०.५ मिली इतका आहे. महिन्याच्या अंतराने पहिले दोन डोस व नंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घ्यावा लागतो. यामुळे ५ वर्षे संरक्षण मिळते. सर्वसामान्यपणे सगळ्यांना पाणी वा अन्नाद्वारे पसरणारी कावीळ ‘अ’ होण्याचा धोका जास्त असतो. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठीही लस उपलब्ध आहे. मात्र एका लसीने एकाच प्रकारच्या कावीळीचा प्रतिबंध होतो. त्यामुळे ज्याला कावीळ ‘ब’ होण्याचा धोका आहे, त्यानेच त्या लसीवर पैसे खर्च करावे हेच योग्य होईल.