दुष्ट लांडगा

0
34

दुष्ट लांडगा

एकदा एका लांडग्याने कपटाने कळपातला एक बोकड पळवून नेला. त्याला मारून अधाशीपणे त्याचे मांस खाऊ लागला असता घाईघाईत मांसातले एक हाडूक लांडग्याच्या नरड्यात अडकले. त्याने हाडूक काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला ते जमले नाही. त्यामुळे त्याचा जीव कासावीस होऊ लागला. श्वास कोंडू लागला आणि दिसेल त्या प्राण्याला आपल्या नरड्यातील हाडूक काढण्याची विनवणी करू लागला. काहींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काही मनात म्हणाले, “एकटा शिकार खातो. कधी एक घास दुसर्‍याला देणार नाही. बरी अद्दल घडली” तर काहींनी हाडूक काढण्याचा प्रयत्न केला असता हाडूक आणखी जास्तच रुतून बसले. आता आपण वाचत नाही, असे लांडग्याला वाटू लागले. इतयात तेथे बगळा आला. त्याला पाहताच लांडगा म्हणाला, “बरे झाले बाबा, देवासारखा धावून आलास. एवढे माझ्या नरड्यात अडकलेले हाडूक काढ, नाहीतर मी आता काही जगत नाही.” बगळ्याला लांडग्याची दया आली. त्याने आपली लांब चोच लांडग्याच्या नरड्यात घालून अडकलेले हाडूक अलगद बाहेर काढून लांडग्याचा प्राण वाचवला असता लांडगा आपल्याला त्याचा जीव वाचवण्याबद्दल काही तरी बक्षीस देईल म्हणून बगळा तेथेच थांबला. बगळा बक्षिसासाठी थांबल्याचे लांडग्याने ओळखताच लांडगा त्याला खवळून म्हणाला, “बक्षिसाची आशा सोड. तू हाडूक काढताना तुझी मान माझ्या तोंडात दिली होतीस तरी मी तुला खाल्ले नाही, हेच बक्षीस समज आणि चालू लाग.” बिचारा बगळा भितीने लगोलग दूर पळाला.”

तात्पर्य :  दुष्ट प्रवृत्तीचे लोक उपकार विसरून अपकारच करायला मागे पुढे पाहत नाहीत.