नगर – बाहेरगावी फिरण्यासाठी गेलेल्या नोकरदार व्यक्तीचा फ्लॅट फोडून सुमारे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैजन असा १ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. सावेडी उपनगरातील सहकारनगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी रविवारी (दि. १२) तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन शशिकांत चितळे (वय ४४) यांनी फिर्याद दिली आहे. ते सहकारनगरमधील शुभ अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहतात. सुट्टी असल्याने ते शनिवारी (दि. ११) सकाळी नऊ वाजता त्यांचा फ्लॅट बंद करून कुटुंबासह अजिंठा येथे फिरण्यासाठी गेले होते. ते मध्यरात्री साडेबारा वाजता घरी आले असता त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता सामानाची उचकापाचक झालेली दिसली. त्यांनी कपाटात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची तपासणी केली असता त्यांना सर्व दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. यामध्ये ३० ग्रॅमचे गंठण, १० ग्रॅमची चेन, सात ग्रॅमची लहान मुलीची चेन व १६ ग्रॅमचे इतर दागिने तसेच चांदीचे पैजन असा १ लाख २५ हजाराचा ऐवज चोरीला गेले असल्याचे लक्षात आले. त्यांनी दुसर्या दिवशी रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी तोफखाना पोलिसांसह फिंगरप्रिंट, डॉगस्कॉड पथकाने भेट दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.