राजेंद्र चोपडा यांच्याकडून आनंद तीर्थ उभारणीसाठी १ कोटींची देणगी

0
58

नगर – नगरमधील राजेंद्र चोपडा यांनी राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज साहेब यांच्या स्मृतीत व अर्हम विज्जाचे प्रणेते, उपाध्याय प्रवर प्रवीणऋषीजी म. सा यांच्या प्रेरणेने शिराळ चिचोंडी येथे गुरु आनंद फाउंडेशनच्या माध्यमातून २५ एकर क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या आनंद तीर्थला १ कोटी रुपयांची भरीव देणगी दिली आहे. याबद्दल त्यांचा जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सत्कार केला. ही देणगी आनंदधाम, धार्मिक परीक्षा बोर्ड येथे प्रवर्तक कुंदनऋषीजी म. सा., उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म.सा., संस्कारप्रेमी आलोकऋषीजी म.सा., तीर्थेशऋषीजी म.सा. यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली. सुभाष मुथा यांनी सत्कार करताना श्री. चोपडा यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देवून इतरांनीही चोपडा यांच्याकडून दानशूरतेची प्रेरणा घ्यावी असे म्हटले. या सत्कारावेळी जैन मंदिरचे अध्यक्ष सुभाष मुथा, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, कचरदास लुंकड (वाकोडीवाला), धरमचंद कोठारी, जयकुमार मुनोत, किशोर विराणी, विनित मुथा, विठ्ठल भोरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुभाष मुथा म्हणाले, साधूसंतांचा सहवास, आशीर्वाद मिळाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात सात्विक भाव तयार होतात. जीवनात मोठे परिवर्तन घडते. धर्मासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. राजेंद्र चोपडा यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भव्य दिव्य आनंदतीर्थाच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांची देणगी देवून आदर्श निर्माण केला आहे. पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आनंदतीर्थ संस्कार केंद्र बनणार आहे. अशा कार्यात योगदान देणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. या देणगीतून लक्ष्मी सत्कारणी लागते, तिचा समाजासाठी सदुपयोग होतो, असे सुभाष मुथा यांनी सांगितले.