गाढवाची गुर्मी

0
49

गाढवाची गुर्मी

एका माणसाने एक गाढव आणि एक कुत्रा पाळला होता. एकदा काही खाण्याच्या जिनसा गाढवावर लादून तो माणूस परगावला चालला होता. बरोबर कुत्राही घेतला होता. चालून थकल्यावर एके ठिकाणी विश्रांती घ्यावी, म्हणून तो माणूस थांबला आणि थोड्याच वेळात झोपी गेला. इकडे गाढव जवळच चरू लागले. कुत्र्याला फारच भूक लागली होती म्हणून ते गाढवाला म्हणाले,” अरे मित्रा, मला फारच भूक लागली बघ. तुझ्याकडे खाण्याचे पदार्थ आहेत. त्यातले थोडे मला खायला दे.” त्यावर गाढव गुर्मीतच म्हणाले, “थोडा वेळ दम धर. आपला मालक उठला, की तो तुला देईल खायला.” यावर बिचारे कुत्रे गप्प बसले. असा काही वेळ जाताच तिकडून एक मोठा थोरला लांडगा आला आणि त्याने गाढवावर झडप घातली असता गाढव ‘आपल्याला मदत करून वाचव’ म्हणून कुत्र्याची विनवणी करू लागले. तेव्हा कुत्रा म्हणाला,” अरे थोडा वेळ थांब. आपला मालक उठला की तो तुला मदत करील. ”असे कुत्रा म्हणत आहे, तेवढ्यात लांडग्याने गाढवाचे नरडे फोडून त्याला ठार केले.

तात्पर्य : गुर्मीने वागल्यास संकटकाळी कोणी मदतीला धावून येत नाही.