भोपाळ दुर्घटना का झाली?

0
36

भोपाळ दुर्घटना का झाली?

१९८५ मध्ये भोपाळच्या युनियन कार्बाईड या कंपनीत वायूगळती झाली व त्यात ५००० लोक बळी पडले. कित्येक हजार लोक आजारी पडले. या घटनेविषयी, त्यानंतरच्या नुकसान भरपाईसाठीच्या आंदोलनाविषयी, तसेच न्यायालयातील साक्षीपुराव्यांविषयीही तुम्ही वृत्तपत्रात वाचले असेल. भारतातील औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेविषयी सर्वांचे डोळे उघडणार्‍या या दुर्घटनेविषयी माहिती घेऊ. भोपाळच्या कारखान्यात वायूगळती झाली. मिथाईल आयसोसायनेट हा तो वायू. सामान्यपणे मिथाल आयसोसायनेट द्रव अवस्थेत असते, पण तापमान ३१ सेंटिग्रेडच्या वर गेले तर मात्र हा द्रव वायूरूप होतो. पाणी व इतर नेक द्रावणाशी मिथाईल आयसोसायनेट संयोग पावत असल्याने चांगल्या प्रकारे निष्क्रीय अशा परिस्थितीत तो साठवावा लागतो. मिथाईल आयसोसायनेट हा अत्यंत विषारी पदार्थ आहे. हायड्रोजन सायनाईड व फॉस्जीन या विषारी वायूपेक्षाही तो जास्त विषारी आहे व त्यांच्यापेक्षा कमी प्रमाणात शरीरात गेला, तरीही गंभीर परिणाम होऊ शकतात. हा वायू त्वचा, डोळे व शरीरातील इतर आवरणांमध्ये दाह निर्माण करतो. वायू शरीरात गेल्यानंतर ४८ तासात मरणार्‍या व्यक्तींमध्ये घशात जळजळ, असह्य अशी डोळ्यांची जळजळ, छातीत वेदना व श्वसनाला खूप त्रास अशी लक्षणे दिसतात. फुफ्फुसाला सूज आल्याने मृत्यू येतो. ५-६ दिवसांत मरणार्‍या व्यक्तींमध्ये स्नायूमध्ये शक्तिपात, लुळेपणास झटके, कोमा ही लक्षणे दिसतात व मृत्यू मेंदूच्या सुजेमुळे होतो. गरोदर स्त्रियांमध्ये या वायूमुळे गर्भपात, अपेक्षित तारखेच्या आधी बाळंतपण व मृत बालकाचा जन्म अशा गोष्टी आढळून आल्या. रक्ताची रासायनिक तपासणी केल्यास त्यात मिथाईल आयसोसायनेट, सायनाईड आयन तसेच मोनोमेथीलामीन हे पदार्थ सापडले. यांच्यावरून सहजगत्या निदान होऊ शकते. या विषबाधेवरचे उपचार लक्षणानुरुप करावे लागतात. प्रतिजैविके, स्टेरॉईडस, डोळ्यांत औषधाचे थेंब व श्वसनासाठी प्राणवायू इ. उपायांचा यात समावेश होतो. अशी दुर्घटना होऊ न देणे, हाच उत्तम उपाय होय. त्यासाठी कारखान्यातील सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. यंत्रसामुग्री, रसायने साठवण्याचे टँकर, रसायने वाहून नेणार्‍या नळ्या इत्यादींची देखभाल नीट केल्यास अशा दुर्घटना टाळता येतील.