१०० टक्के मतदान घडवून आणा, पुढच्या पिढीचं भवितव्य घडवा, ‘लोकशाही जिवंत ठेवा, मतदान करा

0
27

 

या पृथ्वीवर युगान युगं कोंबडा बिचारा पहाटेच उठून आपल्याला झोपेतून उठवायचा दररोज प्रयत्न करतोय.. दुर्दैवाने आपण त्याच कोंबड्याला कापून भ्रष्ट उमेदवारांनी दिलेल्या निवडणुकीतल्या मेजवान्या झोडतो, आयुष्यात जो कोणी आपल्याला झोपेतून उठवायचा प्रयत्न करतो तोच आपल्याला नको असतो, यातून आपण जणू काही हेच सिद्ध करतो की आम्ही काही या धुंदी काळझोपेतून जागे होणार नाही, त्याच तिकिटावर तोच खेळ, भ्रष्ट डोंबार्‍यांचा खेळ, तिच माणसं, तिच आश्वासनं, तोच खेळ खंडोबा आणि ज्यांच्यासाठी आपण अहोरात्र मरमर करतो, त्या आपल्या पुढच्या पिढीची वाताहत आपण घडवतो, आपल्या हाताने केवळ आणि केवळ देशाचा लोकशाहीचा आणि भविष्याचा विचार न करता योग्य उमेदवाराला मतदानच न करता करून घेतो, याची जाणीव ज्या दिवशी होईल तो दिवस खरा लोकशाहीत सुवर्ण अक्षरांनी लिहावा. आता योग्य उमेदवार कोण हा ज्याच्या त्याच्या सद्सदविवेक बुद्धीच्या आवायाचा प्रश्न आहे. केवळ आपल्या जातीधर्माचा आहे म्हणून, किंवा केवळ पाहुण्याचा मेव्हणा आणि मेहुण्याचा पाहुणा आहे म्हणून, किंवा तो त्याच्या ताटातला एक तुकडा आपल्याला चघळायला फेकत असतो म्हणून, किंवा आपले टेंडर किंवा आपल्या हातातल्या संस्था जाऊ नयेत म्हणून मतदान करणारे आणि घडवून आणणारे बरेच लाभार्थी आहेत. परंतु या देशातल्या लोकशाहीचा एक मात्र प्रखर प्रभावी उपाय म्हणजे मला दिलेला मतदानाचा अधिकार, ज्याच्या आधारे मी भविष्य व परिस्थिती बदलवू शकतो. क्षणिक लोभाला बळी न पडता, माझा पुरुषार्थ मी पार पाडू शकतो, तरच मी मतदान करून निवडून दिलेल्या उमेदवाराला ताठ मानेने सर्वांच्या समक्ष समस्यांचा जाब विचारू शकतो, याची जाणिवच नसल्यामुळे, या शनिवार, रविवार जोडून आलेल्या मतदानाच्या सुट्ट्या ट्रीपला जाऊन किंवा घरातच टीव्ही बघत लोळत पडून घरातच बडबड करण्यात घालवणारे महाभाग खर्‍या अर्थाने या देशाचे भवितव्य बिघडवत आहेत असेच म्हणावे लागेल, या महिन्यात मतदानाची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत देशात कुठेच सरासरी ६० टक्क्याच्या पुढे मतदान गेलेले नाही.. मग प्रश्न असा पडतो की १०० पैकी ६० जणच जर मतदान करतात तर उरलेले ४० जण मतदानाच्या दिवशी नेमकं कुठे जातात? निकाल जाहीर होताना मग त्या एकूण १०० मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान केलेल्या फक्त साठ जणांमध्येच मतांची विभागणी अशी होते की फक्त पंधरा किंवा वीस मते पडणारा प्रचंड बहुमताने निवडून आला असे जाहीर होते, आणि मग तोच आपल्यावर राज्य करतो, ती जी मतदानच न करणारी निष्क्रिय चाळीस माणसं आहेत, त्यांनी उमेदवारांकडून मतदानासाठी म्हणून कदाचित दोन दिवस देखील पुरणार नाहीत अशा पैशाची अपेक्षा केलेली असते, किंवा त्यांना देशाच्या भवितव्याचा तर प्रश्न दूरच राहिला स्वतःच्या भविष्याची देखील चिंता नसते.. याला कारण म्हणजे त्यांचा मेंदूच बथ्थड झालेला आहे. या निष्क्रिय लोकांचा मेंदू चायनीज खाऊन खाऊन चायनीज झाला असावा युज अँड थ्रो नो गॅरंटी नो वॉरंटी.. आपण जर सूज्ञ असाल आपली सद्सदविवेक बुद्धी जागृत असेल, तर मतदान करणे म्हणजे तिसरं महायुद्ध खेळण्याइतकी अवघड गोष्ट निश्चित नसून फक्त घरातून नेहमी प्रमाणे बाहेर पडणे गरजेचे आहे, तेव्हा विचार करा आणि शंभर टक्के मतदान घडवून आणा, पुढच्या पिढीचं भवितव्यं घडवा, लोकशाही जिवंत ठेवा मतदान करा.. व इतरांनाही करायला प्रवृत्त करा.- सुहास मुळे, अध्यक्ष, जागरूक नागरिक मंच. ९८२३७२२२१२