गरिबी काय असते?, सर्वसामान्यांचे दुःख काय असतात? ते दुःख जाणणारा मी कार्यकर्ता आहे. गरीबी पाहिली, त्याचे चटके सोसले. मात्र ज्यांना गरीबिची झळच बसली नाही, त्यांना गरिबांचे दुःख काय समजणार. गरिबांच्या मतांवर निवडून येऊन पुन्हा पाच वर्ष तोंड दाखवायचे नाही. त्यांना सत्ता फक्त मोठेपणा मिरवण्यासाठी हवी आहे, मात्र या सत्तेचा वापर सर्वसामान्य व गरिबांचे आश्रू पुसण्यासाठी करणार असल्याची भावना महाविकास आघाडी दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी केले. श्री. लंके यांच्या प्रचारार्थ शहरातील रामवाडी झोपडपट्टी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. श्री. लंके यांनी थेट झोपडपट्टीवासियांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अभिषेक कळमकर, किरण काळे, माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे, विकास उडाणशिवे, साजिद काझी, श्रीरंग अडागळे आदी उपस्थित होते. पुढे श्री. लंके म्हणाले की, खासदार म्हणून निवडून आल्यास शहरातील झोपडपट्टयांचा चेहरामोहरा बदलू. झोपडपट्टी धारकांचे नाव सातबारावर लावण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. कचरा वेचकांचे कल्याण मंडळ स्थापन करुन त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, शिक्षण व त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रास्ताविकात भाऊसाहेब उडाणशिवे यांनी कोणताच उमेदवार खासदाराने आजपर्यंत झोपडपट्टीतील नागरिकांशी आस्थेने विचारपूस केली नाही. लंके हे पहिलेच उमेदवार असून, त्यांच्या पाठिशी सर्वसामान्य जनता उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले. दादाभाऊ कळमकर म्हणाले की, एकदाकी धनदांडगे उमेदवार निवडून आल्यास त्यांना गोरगरीबांच्या प्रश्नांची जाणीव राहत नाही. नोटा देऊन मते घेऊ, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. मात्र सर्व नागरिक स्वाभिमानी असून, त्यांच्या पैश्यांना विकणारे नसल्याचे सांगितले. यावेळी अश्विन खुडे, विकास धाडगे, मनोहर चकाले, सोमनाथ लोखंडे, सचिन साळवे, सनी साबळे आदी उपस्थित होते.