विवाहसोहळ्यातून नवरीच्या दागिन्यांसह रोकडची चोरी

0
15

नगर – विवाह सोहळ्यात नवरी मुलीला घालण्यासाठी केलेले सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील शिरढोण येथे घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आसराबाई रघुनाथ मेहेत्रे (रा.अकोळनेर, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या निवृत्त शिक्षिका असून त्यांच्या भावाच्या मुलाचे लग्न २ मे रोजी नगर तालुयातील शिरढोण येथे होते. त्यानिमित्त त्या शिरढोण येथे गेल्या होत्या. विवाह सोहळ्यात नवरी मुलीला घालण्यासाठी नवरदेव यांच्या कुटुंबाने सोन्या चांदीचे दागिने केलेले होते. ते सांभाळण्यासाठी फिर्यादी मेहेत्रे यांच्या कडे देण्यात आलेले होते. त्यांनी सोन्याचे गंठन, कानातील टॉप्स, पायातील चांदीचे जोडवे तसेच काही रोख रक्कम व मोबाईल असा २ लाख १९ हजार ३१० रुपयांचा ऐवज त्यांच्या जवळील पर्स मध्ये ठेवलेले होते. दुपारी २ च्या सुमारास मंगलकार्यालयात विवाह सोहळ्याची गडबड सुरु असताना अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून ती पर्स चोरली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्यांनी शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग हे करीत आहेत.