नगर जिल्ह्यात लोकसभेसाठी ३७३४ केंद्रांवर मतदान प्रक्रिया

0
75

 

नगर – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण व शिर्डी या दोन मतदार संघात सोमवारी (दि.१३) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या साठी नगर दक्षिण मध्ये २०२६ तर शिर्डी मतदार संघात १७०८ अशी एकूण ३७३४ मतदान केंद्र असून नगर दक्षिण मध्ये १९ लाख ८१ हजार ८६६ तर शिर्डीत १६ लाख ७७ हजार ३३५ मतदार मतदार आहेत. यातील ८५ वर्ष वयापुढील तसेच दिव्यांग अशा नगर दक्षिण मध्ये ८२४ व शिर्डीत ८३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रशासनाने त्यांच्या घरी जावून ही प्रक्रिया पार पडलेली आहे. नगर दक्षिण मतदार संघात २५ तर शिर्डीत २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शनिवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजेपासून जाहीर प्रचार संपणार आहे. तर सोमवारी मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाने त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. नगर दक्षिण मध्ये २०२६ मतदान केंद्रांवर ४०५२ बॅलेट युनिट, २०२६ कंट्रोल युनिट तर २०२६ व्हीव्हीपॅट असणार आहेत. शिर्डी मध्ये १७०८ मतदान केंद्रांवर ३४१६ बॅलेट युनिट, १७०८ कंट्रोल युनिट तर १७०८ व्हीव्हीपॅट असणार आहेत. शिर्डीत ४ तर नगर दक्षिण मध्ये १ मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आलेले आहे. नगर दक्षिणमध्ये १० लाख ३२ हजार ९४६ पुरुष मतदार, ९ लाख ४८ हजार ८०१ महिला मतदार तर ११९ तृतीयपंथी मतदार असे एकूण १९ लाख ८१ हजार ८६६ मतदार आहेत. शिर्डी मध्ये ८ लाख ६४ हजार ५७३ पुरुष मतदार, ८ लाख १२ हजार ६८४ महिला मतदार तर ७८ तृतीयपंथी मतदार असे एकूण १६ लाख ७७ हजार ३३५ मतदार आहेत. चौथ्या टप्प्यातील दोन्ही मतदार संघातील प्रत्यक्ष मतदान प्रक्रीयेकरीता लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. मनुष्य बळाचे रॅन्डमाझेशन करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदान केंद्रावर पुरवण्यात येणार्‍या ईव्हीएम व व्हिव्हिपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅन्डमाझेशन झाले आहे

शनिवारी सायंकाळपासून मद्य विक्री बंद
अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे शनिवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजेपासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत ’ड्राय डे’ घोषित केला आहे. या शिवाय मतमोजणी च्या दिवशी ४ जूनरोजी संपूर्ण दिवस ड्राय डे आदेश लागू राहणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये व मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ चे कलम १४२ च्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकार्‍यांनी हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या ५ किलोमीटर अंतरावर सर्व प्रकारचे देशी, विदेशी दारू विक्रीची दुकाने, परमिट रूम, बियरबार बंद राहणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्‍या दुकाने परमिट रूम, बियर बारचा दारू विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, अशा इशाराही जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिला आहे.