पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्य

0
22

        सौरभ उरमुडे                                          आदिनाथ पाटील

नगर – पाणी साठविण्यासाठी शेतात बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी गेलेल्या २ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुयातील पिंपळगाव वाघा गावच्या शिवारात शुक्रवारी (दि.३) दुपारी घडली. सौरभ दिलीप उरमुडे (वय १६) व आदिनाथ शंकर पाटील (वय १३) अशी या मयत मुलांची नावे आहेत. मयत सौरभ उरमुडे याच्या वडिलांचा नर्सरीचा व्यवसाय असल्याने नर्सरीसाठी पाणी साठविण्यासाठी त्यांनी शेतात सिमेंटची पाण्याची टाकी बांधलेली आहे. शुक्रवारी दुपारी सौरभ हा त्याचा मित्र आदिनाथ याला घेवून पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी गेला होता. आदिनाथ याला चांगले पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी सौरभ याने टाकीत उडी मारून पाण्यात बुडी घेतली. मात्र त्याचाही दम तुटल्याने तो ही पाण्यात बुडाला.

सौरभचे मामा पोपट वाबळे हे शेजारीच राहतात. त्यांनी तातडीने पाण्याच्या टाकीकडे धाव घेत शेजार्‍यांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. तसेच खाजगी वाहनाने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र तेथील डॉटरांनी दोघांनाही उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सौरभ याने नुकतीच १० वी ची परीक्षा दिलेली होती. त्याच्या पश्चात आई, वडील व १ मोठा भाऊ असा परिवार आहे. तर आदिनाथ याने ६ वी ची परीक्षा दिलेली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व २ बहिणी असा परिवार आहे.