नगर – भारतीय संस्कृतीत दान धर्माला अतिशय महत्व आहे. एखाद्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दानाचा उपयोग होतो. फक्त दान देताना मनात किंतु परंतु नसावे. अनेकदा मनात येते आपण त्याला मदत केली पण तो आपल्याशी चांगला वागत नाही. हा भाव मनात अजिबात यायला नको. आपण चांगल्या मनाने मदत केली, दान दिले यातच सर्व काही आले. दान मजबुरीने नाही तर मजबुतीने द्यायला पाहिजे. तरच जीवनात खरा आनंद प्राप्त होईल असे मौलिक विचार उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी महाराज यांनी मांडले. आनंदधाम येथे प्रवीणऋषीजी म. सा. यांचे ’दान धर्म और व्यवस्था’ या विषयावर प्रवचन झाले. १९९८ मध्ये प्रवीणऋषिजी महाराज गौतम निधी संकलन अभियान सुरू केले आहे. समाजातील गरजूंना मदतीचा हात देणे, त्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे या हेतूने सदर गौतम निधी संकलन केले जाते. प्रारंभी आयोजक नरेंद्र फिरोदिया, सुनील मुनोत, सी.ए.अशोक पितळे यांनी स्वागत केले. यावेळी विलास कटारिया, संतोष शेटिया, सचिन देसर्डा, प्रविण कटारिया, सुनील बोरा, स्वप्ना कटारिया, माया धोका आदींसह भाविक उपस्थित होते. प्रविणऋषीजी महाराज यांनी दान धर्माची महती विशद करताना सांगितले की, नदी कधी आपले पाणी पीत नाही. वृक्ष कधी आपले फळ खात नाही. त्यानुसार जो व्यक्ती तनमनधन इतरांना अर्पण करतो तो खरा मानव असतो. दान द्यायचे तर पूर्ण श्रध्देने द्या. भगवान श्रीकृष्णांना कोणी तरी विचारले की, कर्णाला सर्वात मोठा दानी म्हणतात, धर्मराज युधीष्ठिराला का नाही? तेव्हा श्रीकृष्ण एक गोष्ट सांगतात. एकदा सलग चार पाच दिवस अतिवृष्टी सुरू असते. एक ब्राह्मण युधिष्ठिराच्या दरबारात जातो. तो म्हणतो मला माझ्या मुलावर अग्नीसंस्कार करायचे आहेत, मला सुकलेले चंदनाचे लाकूड हवे आहेत. युधिष्ठिर म्हणतात, या वातावरणात मी सुकलेले लाकूड देऊ शकत नाही पण धन हवे तितके देऊ शकतो.
आनंदधाम येथे ’दान धर्म और व्यवस्था’ या विषयावर प्रवचन
ब्राह्मण धन घ्यायला नकार देत कर्णाच्या दरबारात जातो. कर्ण त्या ब्राह्मणाची मागणी ऐकून क्षणाचाही विचार न करता आपल्या दरबारातील चंदनाचे खांब तोडून ब्राह्मणाला देतो. धर्मराज युधीष्ठिराने दान देताना अट ठेवली पण कर्णाने कोणत्याही अटीविना दान दिले. म्हणून त्याला दानशूर कर्ण म्हणतात. कर्णाने अगदी आपली कवच कुंडले सुद्धा दान दिली होती. शालीभद्राचीही अशीच गोष्ट आहे. त्याची परिस्थिती चांगली नसते. त्याची आई इकडून तिकडून सामग्री जमा करून खीर बनवते. तो खीर थंड होण्याची वाट पाहत असतो. इतयात त्याच्या घरी साधू येतात. तो विचार करतो अर्धी खीर साधूला देऊ अर्धी माझ्यासाठी ठेवतो. पण जेव्हा तो खीर वाढतो तेव्हा सगळीच साधूला देऊन टाकतो. साधू तृप्त होऊन परत जातात. आपल्या या कृत्याबद्दल शालीभद्रच्या मनात कसलाही पश्चात्ताप, दुःख नसते. त्यामुळे शालीभद्र सारखा भाव दान देताना मनात असायला हवा. जेव्हा केव्हा दान धर्म कराल तेव्हा त्याची कुठेही वाच्यता करु नये.एकदा दान दिल्यावर पश्चात्ताप करू नये. दान गुंतवणूक नाही तर समर्पण आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. गौतम निधी अभियानातून दिली जाणारी मदत मनात अहंकार आणत नाही. गौतम निधी संकलनात आज पुणे प्रथम क्रमांकावर आहे. तळेगाव ढमढेरे येथे एका व्यक्तीचे संपूर्ण घर खाक झाले होते. गौतम निधीच्या माध्यमातून त्याचे घर नव्याने उभारून देण्यात आले. गौतम निधी अभियान पिढ्यानपिढ्या चालत राहिल. गौतम निधी कलश घरी आल्यावर घरातील लहान मुलांवरही दानधर्माचे संस्कार रूजतील असे प्रविणऋषीजी महाराज यांनी सांगितले.