बालकामगार ठेवणाऱ्या शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत

0
26

रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र दिनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण

नगर – शहरातील नगररचना व मूल्य निर्धारण विभाग या शासकीय कार्यालयात अल्पवयीन मुले कामाला ठेवल्याप्रकरणी बालकामगार प्रतिबंधक कायद्यान्वये जबाबदार अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. शासकीय कार्यालयातच नियमांची पायमल्ली करुन बालकामगार ठेवण्याचा गंभीर प्रकार झालेला असताना पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करुन जिल्हा संघटक मेहेर कांबळे व किरण जाधव यांनी उपोषण केले. रणरणत्या उन्हात उपोषण सुरु होते. नगररचना व मूल्य निर्धारण विभाग कार्यालयात अल्पवयीन मुले कामावर ठेवल्याप्रकरणी बालकामगार प्रतिबंधक कायदा १९८६ अन्वये जबाबदार सहाय्यक संचालक, नगर रचनाकार व इतर संबंधित अधिकारी कर्मचार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आलेला आहे.

या प्रकरणाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे तक्रार अर्जासह देऊन देखील पोलीस प्रशासनाने याप्रकरणी कारवाई केलेली नाही. २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असताना कारवाई करण्याचे पत्र देऊन उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापि कारवाई न करता प्रशासन एकप्रकारे बाल मजुरांना एकप्रकारे प्रोत्साहन देत असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. शासकीय कार्यालयातच थेट बालकामगार आढळल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी वर्ग प्रकरण दाबण्याचे काम करत आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता असल्याने तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. याप्रकरणी तोफखाना पोलीस निरीक्षक यांची तक्रार पोलीस व्हिजिलन्स डिपार्टमेंटकडे केली जाणार असल्याचे मेहेर कांबळे यांनी सांगितले.