उमेदवारी मागे घेतल्याने डॉ परवेज अशरफी यांना थेट पाकिस्तानातून धमकीचा फोन, गुन्हा दाखल

0
25

नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्यानंतर ‘एमआयएम’चे डॉ. परवेज अशरफी यांनी मुस्लिम समाजातील काही पदाधिकार्‍यांच्या प्रचंड दबावामुळे आपला उमेदवारी अर्ज सोमवारी (दि.२९) माघारी घेतला होता. त्यानंतर मंगळवारी (दि.३०) दुपारी त्यांना थेट पाकिस्तानमधून धमकीचा फोन आला आहे. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. तर एमआयएम पक्षाकडून जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल, अशी विरोधकांकडून चर्चा सुरू झाली. मुस्लिम समाजातील काही पदाधिकार्‍यांनी नगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकार्‍यांमार्फत दबाव वाढवला. त्यातून डॉ. अशरफी यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर विरोधकांकडून भाजपची खेळी उलटवल्याचा दावा करण्यात आला. सगळ्या घडामोड्या सुरू असताना डॉ. अशरफी यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते फारसे बाहेर लोकांमध्ये आलेही नाहीत. अशातच त्यांना आता थेट पाकिस्तानातून धमकी आल्याचे समोर आले आहे. त्यांनीच पोलिस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दिली. मंगळवारी (दि.३०) दुपारी ३.२६ च्या सुमारास ते आपल्या घरी (फुटाणे गल्ली, गंजबाजार, नगर) येथे असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअप कॉल आला. समोरून बोलणार्‍याने त्यांना धमकावले. ‘तू और तेरे साथ वाले दीन गिनना चालू कर’, अशी धमकी देण्यात आली. हा धमकीचा कॉल पाकिस्तानमधून आला असल्याचा दावा डॉ. परवेज अशरफी यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या फियार्दीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.