नगरमधील बांधकाम व्यावसायिकाची ९९ लाखांची फसवणूक; विकसित करायला दिलेली जागा दुसऱ्या व्यक्तींना विकली

0
30

नगर – नगर शहरातील तेलीखुंट भागातील जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाशी करार करून त्यांच्या कडून ९८ लाख ९९ हजार ८९१ रुपये घेवून ती जागा परस्पर दुसर्‍याच व्यक्तींना विकत बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ८ जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक अनिल बबनराव जाधव (रा.बोल्हेगाव फाटा, अहमदनगर) यांनी सोमवारी (दि.२९) रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांची दयानंद बिल्डर्स, डेव्हलपर्स या नावाची फर्म आहे. या फर्म मार्फत ते शहर व परिसरात बांधकाम तसेच जागा विकसित करण्याचे काम करतात. त्यांच्या फर्म सोबत दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी गिरीश प्रकाश लोखंडे, कांता प्रकाश लोखंडे, ज्ञानेश्वर मोहन लोखंडे, चंद्रकांत मनोहर लोखंडे, शोभा चंद्रकांत लोखंडे, पद्मा ज्ञानेश्वर लोखंडे आदींनी करारनामा करून त्यांची शहरातील तेलीखुंट येथील जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी ती जागा अनिल जाधव यांच्या दयानंद बिल्डर्स, डेव्हलपर्स फर्मला दिली होती. त्या बदल्यात या सर्वांनी जाधव यांच्या कडून ९८ लाख ९९ हजार ८९१ रुपये रोख व चेक स्वरुपात घेतलेले होते. त्यानंतर काही दिवसांनी या सर्वांनी त्या रकमेचा अपहार करत जाधव यांना वकिलामार्फत खोटी नोटीस पाठविली. नंतर त्यांचा विश्वासघात करत सदर जागा परस्पर पुणे येथील संतोष संभाजी नाळे व उदयसिंग माणिकसिंग ठाकूर यांना खरेदी खत करून विकली. तसेच जाधव यांना पैसे परत करण्यास नकार देत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी ८ आरोपींच्या विरोधात भा.दं.वि.कलम ४२०,४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.