फिंगर प्रिंट्स म्हणजे काय?

0
72

फिंगर प्रिंट्स म्हणजे काय?

अनेक वेळा तुम्ही फिंगर प्रिंटबद्दल ऐकले असेल. एखाद्या हिंदी चित्रपटात खून करून पळालेल्या वा खून केल्याचा संशय असलेल्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांचे ठसे बुद्धिमान पोलिस इन्स्पेटर कोणत्या तरी निमित्ताने (जसे त्याचा पाणी प्यायलेला ग्लास मिळवून वगैरे!) घेतानाही तुम्ही पाहिले असेल. त्याच्या हुशारीला दादही दिली असेल. हाताच्या बोटांच्या ठशांचा खरेच काही उपयोग होतो का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आधी हे लक्षात घेऊ की, बोटांच्या शेवटच्या पेरावर असलेल्या उंचवटे व खोलगट भागांवर हे फिंगर प्रिंट अवलंबून असतात. तुमची बोटे स्वच्छ धुवा. नंतर एखादे भिंग घेऊन त्याखाली बोटे बघा. तुम्हाला असे दिसेल की, बोटांवर चित्रात दाखवल्याप्रमाणे आकार दिसतील. यांना अनुक्रमे आर्च (पद्म), लुप (शंख), व्हर्ल (चक्र) व काम्पोझिट (संमिश्र) आकार असे म्हणतात. बाह्यत्वचा व अंतःत्वचेवर असणार्‍या उंचवटे व खोलगट भागांवर हे आकार अवलंबून असतात. हे जन्मल्यापासून दिसून येतात व आयुष्यभर बदलत नाहीत. त्वचा जर नष्ट झाली तर मात्र तेही नष्ट होतात. शंख, चक्र, पद्म व संमिश्र आकार यांच्या विविध रचना तयार होतात. दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट सारखे केवळ अशयच असते. दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट्स सारखे असण्याची शयता एकास चौसष्ट हजार दशलक्ष इतकी कमी असते. म्हणजे जगाच्या तिसपट लोकसंख्येच्या तिसपट लोकसंख्येतच दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट्स सारखे असू शकतात. या वैशिष्ट्यांमुळे गुन्हेगार पकडण्यासाठी ठशांचा खूप उपयोग होतो. कोणत्याही वयात ते बदलत नाहीत. हाताच्या बोटाची त्वचा शाबूत असलेल्या मृतदेहाचेही फिंगर प्रिंट्स घेता येतात. त्यामुळे व्यक्तीची खात्रीशीरपणे ओळख पटवता येते. एवढेच नाही तर, सांकेतिक भाषेत त्यांची माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवता येते. साहजिकच त्यामुळे बँकेतून पैसे काढताना निरक्षर व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेतात. नोकरीत कायम झालेल्या व्यक्तींच्या सर्व बोटांचे ठसे घेऊन ठेवतात. चोर पकडल्यावर पोलिसही त्याच्या बोटांचे ठसे घेऊन ठेवतात. ओळख पटविण्यासाठी त्याचा पुढे उपयोग करतात. फिंगर प्रिंट्सच्या आधारे अनेक गुन्ह्यातील खरा गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.