कारची दोन मोटारसायकलला धडक; एकाचा मृत्यू, १ जखमी

0
21

नगर – पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने पुढे चाललेल्या २ मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक मोटारसायकल वरील युवकाचा मृत्यू झाला. तर दुसर्‍या मोटारसायकल वरील युवक बालंबाल बचावला असून जखमी झाला आहे. नगर सोलापूर महामार्गावर वाटेफळ (ता.नगर) गावच्या शिवारात शनिवारी (दि.२७) रात्री हा अपघात झाला. सुयश प्रताप पांडूळे (वय २२, रा. पिंपरी घुमरी, ता.आष्टी, जि.बीड) असे मयत युवकाचे नाव असून जयदीप दत्तात्रय पांडूळे (वय २१, रा. पिंपरी घुमरी, ता.आष्टी, जि.बीड) हा युवक जखमी झाला आहे. त्याने नगर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. मयत व जखमी हे दोघे दोन मोटारसायकल वर नगरहून सोलापूर महामार्गाने त्यांच्या गावाकडे चाललेले होते. वाटेफळ (ता.नगर) गावच्या शिवारात विश्वशांती हॉटेलजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या रेनोल्ट कंपनीच्या डस्टर कारने (क्र. एम एच १६ बी एच ०१०७) त्यांच्या दोन्ही दुचाकींना जोराची धडक दिली. या धडकेत सुयश प्रताप पांडूळे हा गंभीर जखमी होऊन मयत झाला तर जयदीप दत्तात्रय पांडूळे हा सुदैवाने बालंबाल बचावला असून तो रस्त्याच्या बाजूला पडून जखमी झाला आहे. अपघातात दोन्ही मोटारसायकल तसेच कारचेही मोठे नुकसान झाले असून कार चालक अपघातानंतर कार तेथेच सोडून पसार झाला. याबाबत जयदीप पांडूळे याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.