राज्यात सत्ताधाऱ्यांकडून ओबीसींची ‘मुस्कटदाबी’

0
18

ओबीसी नेते, उमेदवारांना ‘टार्गेट’ केले जात आहे, त्या फलकावरील कारवाई हा अन्यायच

नगर – ‘ओबीसींनी ओबीसींना सहकार्य करा’ अशा आशयाचे फलक लावणे काहीही चुकीचे नाही. असे फलक लावण्यास प्रशासकीय अधिकार्‍यांनीच . परवानगी दिलेली होती. आधी परवानगी देता, नंतर ती रद्द करता, नोटीस न देताच गुन्हे दाखल करता, हा अन्याय नाही तर काय आहे? असा सवाल करत सत्तेचा गैरवापर करत सत्ताधार्‍यांकडून ओबीसींची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिलीपराव खेडकर यांनी केला आहे. नगर शहरासह परिसरात मागील चार-पाच दिवसांपूर्वी ‘ओबीसींनी ओबीसींना सहकार्य करावे’, असे फलक झळकले होते. या फलकामुळे निवडणुक आचारसंहिता भंग होत असल्याचे कारण देत महापालिका उपायुक्तांनी या फलकाला (होर्डिंग) दिलेली परवानगी पुन्हा रद्द केली. त्यानंतर नगर रचनाकार यांच्या फिर्यादीवरुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या संदर्भात उमेदवार दिलीपराव खेडकर यांच्यासह ओबीसी चळवळीतील राजेंद्र पडोळे, वामनराव भदे, साहेबराव रासकर, लक्ष्मण कोथिंबीरे आदींनी सोमवारी (दि.२९) पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ओबीसीसंदर्भात लागलेले फलक हे प्रचारासाठी नव्हते तर ओबीसी समाज एकत्र व्हावा यासाठी होते.

ओबीसी ही जात नाही तर संवर्ग आहे. या समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी असे फलक लावले तर बिघडले कुठे? प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन हे फलक लावले होते. त्यामुळे त्यात गैर वाटत नाही. परंतु आज जातीय तेढ निर्माण केली जात आहे. ओबीसी नेत्यांना आणि उमेदवारांना ‘टार्गेट’ केले जात आहे. त्यांना गावा-गावातून हाकलून दिले जात आहे. तसे ठराव घेतले जात आहे. बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर असे अनेक ओबीसी उमेदवार आणि नेत्यांना त्रास दिला जात आहे. अशा प्रकारचा मी निषेध करतो, असे खेडकर म्हणाले. आज प्रत्येकास निवडणूक लढण्याचा, प्रचार करण्याचा अधिकार आहे. परंतु ओबीसींवर सध्या मोठा अन्याय सुरू आहे. ओबीसींविरोधात जातीवाचक बोलले जाते, घोषणाबाजी केली जाते परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. ओबीसींना उमेदवारीही डावलली जाते. स्वत:चा मतदारसंघ कमी पडला म्हणून दुसर्‍या मतदारसंघातून उमेदवारी करायची, आम्ही का थांबायचे, किती दिवस तुमच्या सतरंज्या उचलायच्या, आता ओबीसी अन्यायाविरोधात लढणार असल्याचे खेडकर म्हणाले.

ओबीसी विरोधात महाराष्ट्रात षड्.यंत्र

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ओबीसींविरोधात षड्.यंत्र रचले जात आहे. ओबीसींना दडपण्याचे काम चालू आहे. आपल्या विरोधात वातावरण तयार होते की काय, या भावनेने षड्.यंत्र रचले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ओबीसींच्या फलकावर केलेल्या कारवाईकडे पहावे लागेल. मनोज जरांगे पाटील ओबीसी समाजाविरोधात बोलतात. सामाजिक वातावरण दूषित करत आहेत, परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही. येथे मात्र केवळ समाज एक व्हावा, यासाठी लावलेले फलक आधी परवानगी देऊन नंतर ती रद्द करुन हटविले जात आहेत. प्रशासनाने दुजाभाव न करता सर्वांवर कारवाई करावी. जरांगे पाटील जातीय तेढ निर्माण करत असल्याबाबत लवकरच यंत्रणेकडे तक्रार करणार असल्याचे उपस्थित ओबीसी नेत्यांनी यावेळी सांगितले.