शेतकऱ्यांचा मित्र सर्पास मारण्यापेक्षा संरक्षण महत्त्वाचे सर्पमित्र : ॲड हर्षद कटारिया

0
17

बालसंस्कार शिबिरात बालगोपाळांमध्ये सर्पाविषयी जनजागृती

नगर – निसर्गातील जैवविविधता ही निसर्गाचं सौंदर्य समतोल राखण्याचे व संरक्षण करण्याचे काम करते. निसर्गाच्या असंतुलनामुळे दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. सर्प हा शेतकर्‍यांचा मित्र असून, शेतीला हानी पोहोचवणारे पाल, उंदिर, बेडूक त्याचे भक्ष्य आहेत. याचे नियंत्रण साप करतात. साप आढळला तर धोपाट्या टाकून मारू नका. सर्पमित्रास संपर्क करून त्याला निसर्गात पुन्हा मुक्त करा. जेणेकरून त्यांचे संरक्षण व जतन होईल, असे प्रतिपादन सर्पमित्र अ‍ॅड. हर्षद कटारिया यांनी केले. देशभक्त रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्रसेवा दल, अहमदनगर आयोजित बालसंस्कार शिबिरात विषारी, बिनविषारी व निमविषारी सर्पांविषयी माहिती व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी वनपाल अशोक शर्माळे, शिबिर संयोजक शिवाजी नाईकवाडी, सर्पमित्र कृष्णा साळवे, चारूदत्त जगताप, सचिन क्षीरसागर, बालगोपाळ व पालक उपस्थित होते. श्री. कटारिया पुढे म्हणाले की, निसर्गाचे कालचक्र बदलल्याने निसर्गामधील जैवविविधता धोयात आहे. यामुळे निसर्गामधील अनेक दुर्मिळ प्रजाती लोप पावत आहेत. या प्रजातींचे संरक्षण व जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. सर्पांच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. गैरसमजुतीतून सर्पांना मारले जात असून, भावी काळात मुलांना पुस्तकांमध्ये चित्र स्वरूपातच दाखवावे लागतात की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

श्री. कटारिया यांनी प्रोजेटरद्वारे बालगोपाळांना सापांच्या विविध प्रजाती, त्यांची नावे, विषारी, बिनविषारी, निमविषारी अशा सापांचे छायाचित्रांसह सविस्तर विश्लेषण केले व त्याविषयी माहिती दिली. सर्प दिसल्यानंतर विषारी, बिनविषारी, निमविषारी सर्प कसा ओळखायचा, तसेच सर्पदंश झाल्यास काय उपाययोजना करायच्या, याविषयी बालगोपाळांमध्ये जनजागृती केली. यावेळी बालगोपाळांनी देखील आपल्या मनातील प्रश्नांना मोकळीक देत सर्पमित्र हर्षद कटारिया यांच्याशी चर्चासत्राद्वारे मुक्त संवाद साधला. वनपाल अशोक शर्माळे यांनी वन्यजीवांविषयी, तसेच परिसरात दिसणार्‍या बिबट्याविषयी जनजागृती करून वनविभागाच्या विविध योजनांची माहिती दिली, वन विभागाच्या वतीने बिबट्याविषयी जनजागृतीचे परिपत्रक देखील वितरित करण्यात आले. सूत्रसंचालन संयोजक शिवाजी नाईकवाडे यांनी केले, तर आभार कृष्णा साळवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.