कंपनीत दुखापत झाल्याची तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीला चौघांनी केली बेदम मारहाण

0
31

नगर – कंपनीत काम करताना महिलेला दुखापत झाल्याची तक्रार पोलीस अधीक्षक व कामगार न्यायालयाकडे करण्यात आली आहे. ती तक्रार मागे घेण्यासाठी चौघांनी महिलेच्या पतीला मारहाण केली असल्याची घटना बोल्हेगाव उपनगरातील कळमकरनगरच्या कॉर्नरवर घडली. विजय राजु त्रिंबके (वय २९, रा. उभ्या मारूतीजवळ, गांधीनगर, बोल्हेगाव) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि.२४) दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद वाघ (पूर्ण नाव माहिती नाही, रा. एमआयडीसी, नगर), भावड्या ऊर्फ विशाल वाघमारे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), प्रवीण कोळगे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व एक अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी विजय यांची पत्नी रेखा यांना दीपक भाऊसाहेब शिंदे (रा. वैदुवाडी, सावेडी) यांच्या प्रगती डेअरी येथील कंपनीमध्ये दुखापत झाली होती. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज व कामगार न्यायालयात केस दाखल केली होती. दरम्यान मंगळवारी (दि. २३) रात्री साडे अकराच्या सुमारास विजय त्यांच्या घराकडे जात असताना कळमकरनगर येथील कॉर्नरवर त्यांना चौघांनी अडवले. पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल केलेला तक्रार अर्ज व कामगार न्यायालयात दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी चौघांनी विजय यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व फाईटरने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस तपास करत आहेत.