केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील ड्रेनेजलाईनची अवस्था दयनीय

0
54

सर्व कारखानदार त्रस्त; आरोग्याचा प्रश्न गंभीर, अहमदनगर महानगरपालिकेला निवेदन

नगर – केडगाव येथील इंडस्ट्रीयल इस्टेट येथील ड्रेनेजलाईनची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी करून त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत असून कारखानदार व कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील ड्रेनेज लाईनचे काम करण्याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केडगाव येथील इंडस्ट्रियल इस्टेटच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मागील वर्षी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील बोथरा फाँड्री ते ए.डी.एम. मोटर्सपर्यंतच्या ड्रेनेजलाईनचे काम महापालिकेमार्फत झाले होते. त्यावेळी इतर ड्रेनेज लाईनचे काम लवकरच होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही काम चालू केले नाही. वसाहतीमधील सर्व ड्रेनेजलाईन या ३० ते ३५ वर्ष जुन्या आहेत. प्रत्येक लाईनला अडचणी आहेत. काही चेंबर तुटलेले आहेत. तर काही ठिकाणी पाणी रस्त्यावर वाहत आहे.

या ड्रेनेजच्या समस्येमुळे येथील सर्व कारखानदार त्रस्त आहेत. कामगार व कारखानदारांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. सर्व कंपन्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी रिव्हर्स येत आहे. महापालिकेला कळवल्यावर ते जेटिंग मशिनद्वारे उपाययोजना करतात. मात्र, आजही समस्या कायम आहे. त्यामुळे आपण स्वतः इंडस्ट्रीयल इस्टेटला भेट द्यावी व कारखानदारांना होणार्‍या या समस्येतून मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. सुप्रिम अ‍ॅटो पासुन आझाद सॉ मिल पर्यंत, चोपडा पॉली प्रोडट्स पासून ते अ‍ॅटो इंजिनिअर्स पर्यंत, नेक टेनिकल पासून गौरी इंडस्ट्रीजपर्यंत ड्रेनेज लाईचे काम करावे, अशी मागणी सोसायटीचे चेअरमन अरविंद गुंदेचा, व्हा. चेअरमन निलेश मेहेर यांच्यासह सर्व कारखानदारांनी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.