युवकाचे कारमधून अपहरण करत मारहाण करून लुटले

0
22

नगर – चौघांनी युवकाचे कारमधून अपहरण करून त्याला लोखंडी गज, फायटर, लाकडी दांडयाने मारहाण करून जखमी करत लुटल्याची घटना समोर आली आहे. सलमान रफिक पठाण (वय २४, रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित जावळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मार्केटयार्ड, नगर), लखन उत्तम गायकवाड (रा. लोणी व्यंकनाथ) व दोन अनोळखी व्यक्ती यांच्याविरूध्द रविवारी (दि.२१) सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा प्रकार हा नाजूक प्रकरणातून घडला आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सलमान हे जामखेड रोडवरील मुठ्ठी चौक येथे असताना रोहित जावळे व इतरांनी कारमधून येऊन सलमान याच्या दुचाकीला कार आडवी लावली. ‘तु आमच्या मुलीचा नाद सोडून दे, तिच्या नादी लागू नको’ असे म्हणून फायटर, लोखंडी गज व लाकडी दांडयाने मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ, दमदाटी करून सलमानच्या ताब्यातील दुचाकी, सोन्याची चैन व मोबाईल असा ५२ हजार रूपयांचा ऐवज काढून घेतला. त्याचे अपहरण करून नंतर त्यास रस्त्यावर सोडून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी सलमान यांच्यावर नगरमधील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण एस. साळुंके अधिक तपास करत आहेत.