वाडिया पार्क क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलची मोठी दुरावस्था

0
94

अस्वच्छता, अपुरी लाईट आणि कोर्टसवरील खड्ड्यांमुळे खेळाडू त्रस्त : जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

नगर – शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याच्या वल्गना यापूर्वी अनेकदा झाल्या परंतु त्याचे पुढे काय झाले, हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच सध्या या क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय झाली आहे. साफसफाई आणि स्वच्छतेची बोंब कायम होत असून विविध खेळांसाठी निर्माण केलेल्या स्वतंत्र व्यवस्थेचीही पूर्णत: दुरावस्था झाली आहे. येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सोयीसुविधांची वाणवा असून सर्वत्र अस्वच्छता, अपुरी लाईट व्यवस्था, बंद पडलेले फॅन, कोर्टस्वर पडलेले खड्डे, पावसाळ्यात छताची होणारी गळती यामुळे येथील दररोज प्रॅटिसला येणार्‍या खेळाडूला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांचे या क्रीडा संकुलाकडे पूर्णत: दुर्लक्ष झालेले असून खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे. वाडिया पार्क मध्ये मल्टिपर्पज हॉल आहे. तिथे बॅडमिंटन या खेळाचे १० अद्ययावत मॅटिंगचे होवा कोर्टस् आहेत जे वूडन कोर्ट वर अंथरलेल्या आहेत राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरावरील बॅडमिंटनच्या मॅचेस देखील येथे झालेल्या आहेत. सध्या मात्र या कोर्टस्ची अवस्था मात्र दयनीय अशीच झाली आहे.

खरं तर सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत रोज या कोर्टस्वर प्रशिक्षणार्थी खेळाडूंसह सुमारे २०० ते २२५ खेळाडू येथे बॅडमिंटन खेळत असतात. सर्वात जास्त क्रीडाधिकारी कार्यालयास महसूल देणारे हे कोर्टस् मधील अपुरे लाईट्स, बाथरूम, मधील अस्वच्छता, कोणताही एसऑस्ट फॅन चालू नाही अनेक कोर्टस्वर पडलेले खड्डे, पावसामध्ये गळती यामुळे येथे खेळणारे खेळाडू वैतागलेले आहेत. अनेक खेळाडूंना छोट्या मोठ्या दुखापती होत असताना देखील क्रीडाधिकारी कार्यालय पोकळ आश्वासना व्यतिरीक्त कोणतीही सुधारणा करत नाही, वस्तुस्थिती असून खेळाडूंना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक वेळा खेळाडूंनी विनंत्या केल्या, समक्ष भेटून विनवण्या करून, निवेदन देऊनही आहे तशीच परिस्थिती आहे.