संभाषण कौशल्य व आर जे कार्यशाळेचा रेडिओनगरमध्ये समारोप

0
16

नगर – बदलत्या समाजाचे लोक माध्यम स्नेहालयाचे रेडिओनगर ९०.४ एफ् एम येथे संभाषण कौशल्य व रेडिओ निवेदन (आर.जे) हा तीन महिने कालावधीचा नाविन्यपूर्ण कोर्स व कार्यशाळा लेखक, संगीत समीक्षक व निवेदक सुहासभाई मुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. व त्याचा समारोप झाला. यावेळी प्रशिक्षक व समन्वयक सुहासभाई मुळे म्हणाले की आजकाल सगळीकडे संवादाचा अभाव दिसून येतो, त्यामुळे योग्य अशा नेमया मोजया शब्दात योग्य पद्धतीने आणि प्रभावीपणे संवाद साधणे ही एक दुरापास्त गोष्ट झाली आहे. कुठल्याही प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे संभाषण असते आणि तीच पायरी जर कमकुवत असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी कोलमडणार हे निश्चित आहे. आजच्या पिढीमध्ये निरीक्षण, ग्रहण, चिंतन मनन, स्मरण व शेवटी प्रभावी सादरीकरण या सर्वच गोष्टींचा अभाव असल्यामुळे आजचे तरुण मानसिक व वैचारिक दृष्ट्या अतिशय कमकुवत ठरत आहेत. यासाठी सदर कोर्सची व सिलॅबस ची संरचना करून ही कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळा पूर्ण करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना रेडिओनगर तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्नेहालयाचे संचालक भूषण देशमुख, साहित्यिक व अशोकराजे निंबाळकर, केंद्रप्रमुख संदीप क्षीरसागर, ग्राहक पंचायतीचे प्रमुख गजेंद्र क्षीरसागर, वगैरे प्रभृती उपस्थित होते. यावेळी भूषण देशमुख यांनी संभाषण कौशल्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाच्या कानाकोपर्‍यात सहज पोहोचू शकतो, त्यासाठी रेडिओसारखे दुसरे सोपे माध्यम नाही, आणि त्यासाठी सदर कोर्स करणे अतिशय फायदेशीर ठरेल असे सांगितले. अशोकराजे निंबाळकर यांनी सदर कोर्स बाबत बोलताना १४ विद्या आणि ६४ कला यामध्ये सर्वात अंतर्भाव असलेली, व प्रभावीपणे व्यक्त होण्यासाठी संभाषण कौशल्य ही कला सुहासभाई मुळेंसारख्या बहुआयामी, बहुश्रुत आणि अनुभवी व्यक्तीकडून अवगत करणे हे फार मोठे प्रशिक्षण आहे, याचा उपयोग सर्वांना आयुष्यातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये निश्चित होईल असे प्रतिपादन केले. कार्यशाळेमधे संदीप क्षीरसागर यांच्या सहकार्याने, सौ. चारू शिवकुमार, किरण खोडे, अदिती भुसारे, भार्गवी क्षीरसागर, अ‍ॅड. अंकिता सुद्रिक प्रशांत छजलानी, स्वाती बागडे, स्वयम भास्कर, संतोष, कैलास दळवी, राजू ढोरे, मकरंद घोडके, नरेंद्र बागडे यांनी सहभाग घेतला. याच कार्यशाळेची पुढील महिन्यामध्ये (जून २०२४) दुसरी बॅच घेण्यात येणार असून माहितीसाठी ९० ११ ११ २३ ९० यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.