महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहकांना बसतोयं आर्थिक भुर्दंड

0
24

सदोष वीज पुरवठ्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान

नगर -महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असून कधी कधी तर अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरातील इलेट्रॉनिक उपकरणे जळणे, नादुरूस्त होऊन मोठे नुकसान होत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी याबाबत तातडीने दखल घेऊन विजेच्या तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांच्या उपकरणांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. शहरातील मुकूंदनगर परिसरात मागील १५ दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. रमजान सणाच्या काळातही वीज पूरवठा वारंवार खंडीत होत होता. मागील काही दिवसांपासून मुकूंदनगरच्या काही भागात उच्च दाब तर काही भागात अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा हेात असल्याने नागरिकांच्या घरातील टिव्ही, फ्रिज, कूलर, मिसर यासह वायर जळून मोठे नुकसान होत आहे. नागरिकांच्या या नुकसानीला महावितरण कंपनीच जबाबदार असून झालेल्या नुकसानीची ग्राहकांना भरपाई द्यावी, अन्यथा कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. वीज ग्राहक महावितरणला नियमितपणे बील भरत आहेत.

कंपनीनेही वीज पुरवठ्यातील तांत्रिक दोष तात्काळ शोधून ग्राहकांना नियमित वीज पुरवठा करणे आवश्यक आहे. कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशावेळी सदोष वीज पुरवठ्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे हा ग्राहकांचा अधिकार असून कंपनीने त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. मीटर रिडींग आणि बील ही अंदाजेच मुकूंदनगर परिसरात महावितरणने नेमलेली माणसे मिटर रिडींग घेण्यासाठी येत नाही. त्यामुळे बिलाची रक्कम अंदाजेच आकारली जाते, असे असले तरी अंदाजे आकारलेली जाते. असे असले तरी अंदाजे अकारलेली वीज बिले ग्राहकांपर्यंत पोहच केली जात नाहीत. त्यामुळे ग्राहकांनाच सायबर कॅफेमध्ये जाऊन काही शूल्क देऊन स्वत:चे बील काढून घेऊन ते भरावे लागत आहे. अंदाजे रिडींग आणि अंदाजेच बीलाची आकारणी करूनही बील मिळविण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. महावितरणने या कार्यपध्दतीत सुधारणा करून सुरळीस वीज पुरवठा करण्याबरोबरच नियमितपणे बीलाचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे.