किराणा दुकान व मेडिकल फोडून रोख रकमेसह साहित्याची चोरी; गुन्हा दाखल

0
30

नगर – एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकात शेजारी शेजारी असलेले किराणा दुकान व मेडिकल अज्ञात चोरट्यांनी फोडून दोन्ही दुकानातून रोख रक्कम तसेच किराणा साहित्य व सौंदर्य प्रसादने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत योगेश मधुकर करांडे (वय ३०, रा. मुंजोबा चौक, नागापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी करांडे यांचे सह्याद्री चौक येथे स्वराज सुपर मार्केट नावाचे किराणा दुकान आहे. ते गुरुवारी (दि. १८) रात्री १० वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतरच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानात सर्वत्र उचकापाचक करून गल्ल्यातील रोख रक्कम तसेच दुकानातील ड्रायफ्रुट, मसाले व तुपाचे लहान डबे असे साहित्य चोरून नेले. जाताना चोरट्यांनी या दुकानाशेजारी असलेले अजित आप्पासाहेब यादव यांचे संत वामनभाऊ मेडिकल व जनरल स्टोअर या दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश करत दुकानातील फेसवॉश, आईसक्रिम बॉस व बॉडी स्प्रे असे साहित्य चोरून नेले आहे. शुक्रवारी (दि.१९) सकाळी करांडे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही बाब एमआयडीसी पोलिसांना सांगितली. ही माहिती कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. ठसे तज्ञ यांचे पथकही बोलावण्यात आले. त्यांनीही चोरट्यांचे ठसे मिळतात का याची पाहणी केली. याबाबत योगेश करांडे यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.