नगरमध्ये भल्या सकाळीच रस्त्याने चाललेल्या शिक्षिकेचे मिनिगंठन हिसका मारून लांबवले

0
48

नगर – नगर शहर परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत असून रस्त्याने पायी चाललेल्या शिक्षिकेचे मिनिगंठन पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या एका चोरट्याने धक्काबुक्की करत हिसका मारून तोडून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी ७.२० च्या सुमारास तारकपूर परीसरातील आयुष हॉस्पिटल समोर घडली. याबाबत निर्मला अनुप ढोरमले (रा. जातेगाव, ता.पारनेर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री फिर्याद दिली आहे. फिर्यादी ढोरमले या शिक्षिका असून त्या शुक्रवारी सकाळी ७.२० च्या सुमारास पत्रकार चौक ते डीएसपी चौक रस्त्याने चाललेल्या असताना तारकपूर परीसरातील आयुष हॉस्पिटल समोर त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे मिनिगंठन हिसका मारून तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी त्यास प्रतिकार केला असता त्या चोरट्याने त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांचे मिनिगंठन हिसका मारून तोडत मोटारसायकलवर भरधाव वेगात पळून गेला. याबाबत त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान नगर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हे चोरटे हिसका मारून तोडून नेत आहेत. ३-४ दिवसापूर्वीच मार्केटयार्ड मागील चैतन्य कॉलनीत सायंकाळी वॉकींगला चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने बळजबरीने हिसका मारून तोडून नेल्याची घटना घडली होती. त्या चोरट्याला त्या महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना चोरट्याने जोरदार धक्का दिल्याने त्या रस्त्यावर पडून जखमी झाल्या होत्या. तसाच काहीसा प्रकार पुन्हा तारकपूर परिसरात घडला आहे. वारंवार होणार्‍या या घटनांमुळे शहर परिसरात महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.