नगर शहरातील बाजारपेठेत महिला पोलिसाला मारहाण

0
56

वाहतूक कोंडी सोडवताना भररस्त्यातच घडला प्रकार; गुन्हा दाखल, आरोपी अटकेत 

नगर – वाहतूक कोंडी झाली म्हणून ती सोडविण्याचा प्रयत्न करत असलेल्या कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी महिलेला भररस्त्यात शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग करण्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी (दि.१८) सायंकाळी कापड बाजार रोडवरील भिंगारवाला चौकाजवळ असलेल्या द्वारकादास लस्सी दुकानासमोर घडला. या प्रकरणी प्रकाश सखाराम घोलप (वय ५२, रा.नांगरे गल्ली, माळीवाडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस नाईक यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या कर्तव्यावर असताना एका आरोपीच्या शोधार्थ कापड बाजाराकडे गुरुवारी (दि.१८) सायंकाळी चाललेल्या होत्या. त्यावेळी द्वारकादास लस्सी दुकानासमोर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्या पुढे सरसावल्या व आडवी, तिडवी वाहने घालणार्‍या वाहनचालकांना त्या वाहने मागे पुढे घेण्याबाबत सूचना देत होत्या. आरोपी घोलप हाही त्या वाहतूक कोंडीत अडकलेला होता. त्यास वाहन पुढे घेण्यास सांगितले असता त्याचा राग येवून त्याने फिर्यादीला शिवीगाळ सुरु केली.

त्यावेळी फिर्यादी या ‘मी पोलिस नाईक आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे माझे कर्तव्य आहे, तुम्ही शिवीगाळ करून वाद न घालता तुमचे वाहन बाजूला घ्या’, असे समजावून सांगत असताना आरोपी घोलप याने फिर्यादीचा हात पकडून शिवीगाळ करत चापटीने त्यांना मारहाण करू लागला. तसेच फिर्यादीची गळ्यातील ओढणी ओढत त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. याशिवाय त्या कर्तव्य बजावत असताना त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश घोलप याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३, ३५४, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर पो.नि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. नि. योगिता कोकाटे व पोलिस पथकाने आरोपी घोलप यास रात्री ११.३० वा. अटक केली आहे.