अतिक्रमणावर कारवाई करण्याऐवजी महापालिकेने तक्रारदाराचेच पाडले घर

0
39

प्रशासनाच्या ढिसाळ व मनमानी कारभाराचा निषेध; घराची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू

नगर – अतिक्रमणांविरोधात कायदेशीर लढा देणार्‍या तक्रारदाराचेच घर पाडण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने १८ एप्रिल रोजी केली आहे. अतिक्रमणधारकावर कारवाई करण्याऐवजी तक्रारदाराचेच घर पाडणे म्हणजे ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ असाच हा प्रकार असल्याचा आरोप करत अतिक्रमणधारकाचे अतिक्रमण काढा अन्यथा माझ्या घराची नुकसान भरपाई द्या, या मागणीसाठी तक्रारदार सुरज चंद्रकांत नामदे यांनी शुक्रवारी (दि.१९) महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शहरातील गौरी घुमट परिसरात वीर सावरकर बाल उद्यान येथे महापालिकेची २१ गुंठे जागा आहे. सदर जागेवर झालेली अतिक्रमणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हटविण्यात आली होती. तथापि एका व्यक्तीच्या अतिक्रमणावर जुजबी कारवाई करण्यात आली. महापालिकेने अतिक्रमण हटविले की संबंधित व्यक्ती दोन दिवसात पुन्हा अतिक्रमण करत आहे. यासंदर्भात भेदभाव न करता सदर जागेवरील अतिक्रमणे सरसकट हटवावीत, अशी मागणी श्री. नामदे यांनी महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत महापालिका प्रशासनाने १८ एप्रिल रोजी कारवाई केली मात्र या कारवाईत अतिक्रमणधारकाचे अतिक्रमण हटविण्याऐवजी तक्रारदार नामदे यांचेच घर अतिक्रमणात असल्याचे सांगत ते पाडून टाकले आहे.

प्रशासनाच्या या पक्षपाती कारवाईचा निषेध करत नामदे यांनी शुक्रवारी (दि.१९) सकाळपासून महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आम्ही चांगले काम करतो म्हणून आमचे घर पाडून आमच्या कामाची महापालिकेने अशी पावती दिली आहे काय? ज्याचे अतिक्रमण काढायचे त्याचे अतिक्रमण नसल्याचे प्रभाग अधिकारी सांगतात मग माझे अतिक्रमण कसे? अतिक्रमणधारकाच्या म्हणण्यानुसार महापालिका कारवाई करते काय? आयुतांनी एकतर्फी कारवाई का केली? काढायचे तर सर्वांचे अतिक्रमण काढा, सर्वांना समान न्याय द्या, आयुक्तांनी स्थळ पाहणी व तपासणी करुन कारवाई करावी, अशी मागणी करत सुरज नामदे यांनी महापालिकेच्या ढिसाळ आणि मनमानी कारभाराचा जाहीर निषेध केला आहे. त्याचबरोबर न्याय मिळविण्यासाठी सदर प्रश्नावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहचून न्याय मिळण्याची अपेक्षा केली आहे.