झोका बांधताना गळफास बसून शाळकरी मुलाचा मृत्यू

0
28

नगर – झोका खेळण्यासाठी दोरी घेवून झाडावर चढून फांदीला झोका बांधत असताना अचानक तोल जावून खाली कोसळल्याने गळफास बसून १३ वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १७) दुपारी घडली. सतीश काळूराम तांबे (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) असे या मयत बालकाचे नाव आहे. मयत सतीश याने नुकतीच सहावीची परीक्षा दिली होती. त्याचे कुटुंबीय मेंढपाळ असून शाळेला सुट्ट्या लागल्याने सतीश हा ही आई आणि भावासोबत पारनेर तालुयातील पिंपळनेर गावच्या शिवारात असलेल्या सांगळे वस्ती येथे बुधवारी (दि. १७) मेंढ्या चारण्यासाठी गेलेला होता. दुपारी घोड्यांना पाणी पाजून तो झोका खेळण्यासाठी कडूलिंबाच्या झाडाला झोका बांधण्यासाठी झाडावर चढला.

झाडाच्या फांदीला दोरी बांधत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला आणि त्याच वेळी दोरी त्याच्या गळ्यात अडकत त्याला अचानक गळफास बसला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला त्याचे नातेवाईक नाथा येसू तांबे यांनी तातडीने पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉटरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरेवरून पारनेर पोलिस ठाण्यात सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सतीश तांबे याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.