विखेंचा बॉडीगार्ड असल्याचे सांगत लंकेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

0
79

 

रॅलीत सहभागी झाल्याचे कारण; पाथर्डी पोलिस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल

नगर – तू निलेश लंके यांच्या रॅलीत का फिरतोस, मी विखेंचा बॉडीगार्ड आहे, हे तुला माहीत नाही का, असे म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यास मारहाण करण्यात आली. ही घटना दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिराळ (ता. पाथर्डी) शिवारात हॉटेल शिवतेजसमोर घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव सुधाकर गर्जे, रामेश्वर प्रकाश पालवे, ज्ञानेश्वर प्रकाश पालवे (सर्व रा. कोल्हार कोल्हुबाईचे, ता. पाथर्डी) व इतर दोघे, अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहादेव भानुदास पालवे (रा. कोल्हार कोल्हुबाईचे, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. ५ एप्रिल रोजी निलेश लंके यांची चिचोंडी येथील प्रचार फेरी संपल्यानंतर फिर्यादी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून शिराळमार्गे मजले चिंचोलीला जात होते. ते पाण्याची बाटली घेण्यासाठी शिवतेज हॉटेल येथे थांबले होते. तेव्हा तिथे गर्जे याच्यासह इतर पाचजण आले. गौरव गर्जे याने शहादेव पालवे यांच्या दुचाकीस त्याची दुचाकी आडवी लावून ओमीनीमधील इसमांनी जवळ येत गौरव गर्जे याने शिविगाळ करण्यास सुरूवात केली. तु निलेश लंके याच्या रॅलीत का फिरतोस ? मी विखेचा बॉडीगार्ड आहे हे माहीती नाही का ? असे विचारत हातातीलन गजाने डाव्या बाजूच्या बरगडीवर मारहाण केली. गळयातील एक तोळयाची चेन ओरबडली. त्याच वेळी रामेश्वार पालवे याने डोयात दगड मारला आणि खिशातील १७ हजार ७५० रूपयांची रोकड काढून घेतली. इतर दोन अनोळखी इसमांनी पोटात लाथा बुक्क्यांनी, रॉडने मारहाण करीत गौरव गर्जे याने तुला मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर शिविगाळ करत सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी ५ जणांवर भा.दं.वि. कलम ३४१, ३२४, ३२७, १४३, १४७, १४८,१४९, ३२३, ५०४,५०६ आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाकडून मिळविली ‘एफआयआर’ची प्रत

दरम्यान ही घटना ५ एप्रिल रोजी झाल्यावर फिर्यादी पालवे हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी त्यांचा जबाब ८ एप्रिलला नोंदवला. मात्र गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली. त्यानंतर फिर्यादी पालवे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यावर ११ एप्रिलला गुन्हा दाखल केला. पण त्याची प्रत फिर्यादीला दिली नाही. शेवटी फिर्यादीने पाथर्डी न्यायालयात धाव घेतली त्यामुळे न्यायालयाने फिर्यादी पालवे यांना एफ आय आर ची प्रत उपलब्ध करून दिली. पोलिसांवर विखे यांचा मोठा राजकीय दबाव असल्याने असा प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादी शहादेव पालवे यांनी केला आहे.