भविष्यातील नगरच्या विकासाच्या नवनवीन संकल्पनांच्या मंथनास प्रारंभ

0
27

विचार भारतीच्या जन संवादास सर्व क्षेत्रातून प्रतिसाद

नगर – लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका निवडणूक आल्यावर सर्वच राजकीय पक्ष किंवा उमेदवार स्वतः तयार केलेला विकासाचा अजेंडा जाहीर करत असतात. मात्र मतदार संघातील सामान्य जनतेच्या मनात कोणती कामे व कसा विकास अपेक्षित आहे हे विचारात घेतले जात नाही. यासाठी सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या अपेक्षा काय आहेत? त्यांना भेडसावणारे प्रश्न समस्यांना वाचा फुटावी तसेच विकासाच्या नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी काम करणार्‍या नगरच्या विचार भारतीच्या वतीने जन संवाद हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. भविष्यातील नगरच्या विकासाच्या नवनवीन संकल्पनांच्या मंथनास प्रारंभ झाला असून विचार भारतीच्या या जन संवाद उपक्रमास सर्वच क्षेत्रातून प्रतिसाद मिळत आहे. जन संवाद अभियांची माहिती देताना रवींद्र मुळे म्हणाले, वेगाने विकसित होणार्‍या भारत देशात आपले अहिल्यानगर मागे न राहता त्याच वेगाने विकसीत नगर घडवू असा निर्धार करत हे जन संवाद अभियान सुरु केले आहे. गेल्या चार दिवसापासून जन संवाद उपक्रमातून विविध क्षेत्रातिल नागरिक, तज्ञ, विचारवंत व अभ्यासू व्यक्तींशी संवाद साधूण्यात येत आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या नगरच्या विकासासाठी काय अपेक्षा व संकल्पना आहेत याला प्रथमच व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या संकल्पनांचे संकलन करून लवकरच नगरच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट विचार भारती तयार करणार आहे. जन संवाद उपक्रमा अंतर्गत एमआयडीसी मधील कारखानदार व उद्योजकांची बैठक मराठा चेंबर ऑफ कॉम र्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, मराठा चेम्बर ऑफ कॉमर्सचे उपध्यक्ष प्रकाश गांधी, विचार भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, उद्योजक आनंत देसाई, विनायक देशमुख आदींसह एमआयडीसी मधील कारखानदार व उद्योजक उपस्थित होते. या बैठकीत उपस्थितांनी एमआयडीसीच्या विकासासाठी नव्या संकल्पना मांडण्याबरोबरच अनेक प्रलंबित समस्याही मांडल्या.

अरविंद पारगावकर म्हणाले, शहराच्या विकासास चालना मिळणे आवश्यक आहे. शहराबरोबरच एमआयडीसीचे प्रश्न बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिल्याने त्यांच्या कडे आपल्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केलाच पाहिजे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी समूहाने एकत्रित येणे आवश्यक आहे. विचार भारतीच्या वतीने पुढाकार घेऊन एक दबाव गट निर्माण करण्यात येत असल्याने समाधान वाटत आहे. यावेळी प्रकाश गांधी, प्रमोद मोहळे, हरजितसिंग वधवा, बलभीम पठारे आदींनी विविध सूचना व संकल्पना मांडल्या. विचार भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रवर्तक रविंद्र मुळे यांनी जन संवाद अभियानाची माहिती दिली. सचिव सुधीर लांडगे यांनी आभार मानले. उपाध्यक्ष अनिल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. शहरातील शिक्षक संस्था व शिक्षकांशी झालेली जन संवाद बैठक श्रीरामकृष्ण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीगोपाल जाखोटिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नानासाहेब देशमुख, ज्ञानसंपदा स्कूलचे प्रवीण बजाज, दामोदर बठेजा, विचार भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी आदींसह शैक्षणीक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्रीगोपाल जाखोटिया यांनी नव्या शैक्षणीक धोरणावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, पुढील पाच वर्षात शैक्षणीक क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित आहे.

त्यामुळे शैक्षणीक संस्थानी नवे धोरण स्वीकारून त्यासाठी सज्ज व्हावे. शासनाने व लोकप्रतिनिधीने सर्व शैक्षणीक संस्थाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे. यावेळी नगर मधील तरुणवर्ग उच्च शिक्षणासाठी बाहेर जातो व बाहेरच स्थाईक होतो. जर नगरमध्ये पुण्या मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक उच्च शिक्षणाची सोय झाली तर बाहेर जाणारा तरुणवर्ग नगरमध्येच राहील. यासाठी विचार करून अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. सीए असोसिएशन बरोबर झालेल्या जन संवाद बैठकच्या अध्यक्षपदी सीए असोसिएशनचे अध्यक्ष सीए सनित मुथा होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष सीए प्रसाद पुराणिक, सचिव सीए अभय कटारिया, खजिनदार सीए महेश तिवारी, माजी अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर काळे व सीए पवन दरक, सीए ज्ञानेश्वर कुलकर्णी. सीए किरण भंडारी आदीसह सीए असोसिएशन व विचार भारतीचे सहसचिव महेंद्र जाखेटे उपस्थित होते. यावेळी सीए मयूर कासवा यांनी स्मार्ट व ग्रीन नगर सिटीचा तयार केलेला अहवाल यावेळी विचार भारती कडे सुपूर्द केला. नगरच्या विकासाठी लवकरात लवकर आयटी सेंटर सुरु करावे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय नगरमध्ये सुरु व्हावे. नगरमध्ये लष्कराच्या अनेक प्रमुख आस्थापने आहेत. त्यामुळे नगरमध्ये एकतरी संरक्षण क्षेत्रातील उद्योग सुरु होणे गरजेचे आहे. शहरा जवळ विमानतळासाठी जागा उपलब्ध करून विमानतळ सुरु करावे, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.