हनुमान चालीसा पठन, भजनसंध्याने सर्जेपुरा परिसर दुमदुमला

0
16

राधाकृष्ण मंदिराच्या भजन संध्येत भाविक तल्लीन, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की …

नगर – राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा! अशा हनुमान चालीसा पठनाने व विविध भाव-भक्ती गीतांनी शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिराच्या (ट्रस्ट) प्रांगणात हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. या धार्मिक कार्यक्रमासाठी शीख, पंजाबी व इतर समाज बांधव सहभागी झाले होते. श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या कलाकारांनी या भजन संध्येच्या कार्यक्रमात रंग भरला होता. संपूर्ण परिसर या सोहळ्याने भक्तीमय बनला होता. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर, या हनुमान चालीसाच्या विविध चालीतील गायनाने कार्यक्रमात भक्तीचे रंग उधळले. नागरिकांनी सामुदायिक पठणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन भक्तीगीतांवर ठेका धरला होता. हनुमान चालीसा गायन व विविध भजने, भक्ती गीतामध्ये उपस्थित भाविक तल्लिन झाले होते. तेरे रहमो करम का या कहना…, मईया देनेवाली है हम लेने वाले है…, जब से नैन लडे गिरधारी से…, रामजी की निकली सवारी…, सीने मे मेरे सिताराम बसते… अशा अभंग, गवळणी व भक्ती गीतांनी ही भजन संध्या उत्तरोत्तर रंगली.

राम सियाराम, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की… या भजनानेही भाविक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमात हनुमानजीच्या वेशभुषेतील युवकाने सर्वांचे लक्ष वेधले. हनुमानजीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. समाजातील विविध क्षेत्रात यश मिळवणार्‍या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुणे येथील तारे जमीन फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जागृती ओबेरॉय व एलएल.एम. परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आठवे स्थान पटकाविल्याबद्दल ड. भावना आहुजा-नय्यर यांचा सत्कार विमला देवी धुप्पड व स्विटी प्रदीप पंजाबी यांनी केले. भाविकांचे स्वागत करुन ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांनी आभार मानले. श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाच्या कलाकारांचाही प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व विश्वस्तांनी परिश्रम घेतले.