महापुरुषांना जातीधर्माच्या चौकटीत न बसविता त्यांच्याकडे ‘मानवतावादी दृष्टिकोना’तून पहावे

0
19

डॉ. भास्कर रणनवरे यांचे प्रतिपादन; सावेडीत सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम व व्याख्यानाने महापुरुषांची जयंती साजरी

नगर – महापुरुषांचे खरे विचार व कार्य समाजापुढे येण्याची गरज आहे. यासाठी त्यांच्या विचारांचा जागर आवश्यक आहे. महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीत न बसविता त्यांना मानवतावादी दृष्टीकोनाने पहावे. सध्याची देशाची हुकुमशाही व गुलामगिरीकडे वाटचाल सुरू आहे. संविधानाने देश चालतो, मात्र संविधानाच धोयात आले आहे. ही भीती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील व्यक्त केली आहे. जातीयवादी प्रवृत्तीच्या हातात सत्ता गेल्याने बहुजनांना एकजुटीने संघर्ष करावा लागणार आहे. काय खावे?, काय बोलावे यावर निर्बंध आणले जात असून, या गुलामगिरी विरोधात बंड करावा लागणार असल्याचे डॉ. भास्कर रणनवरे यांनी सांगितले. सावेडी येथे महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. नवीन पिढीत महापुरुषांचे विचार रुजविण्यासाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गुलमोहर रोड येथील आम्रपाली मंगल कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन कार्यक्रमाचे प्रारंभ झाले. डॉ. भास्कर रणनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिरीष जाधव, प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. रत्ना वाघमारे, इंजि. संजय शिंदे, रावसाहेब काळे पाटील, खालीद खान, एन.एम. पवळे, एस.आर. आरू, शिवाजी भोसले, विनोद साळवे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिरीष जाधव यांनी मागील २२ वर्षापासून समितीच्या वतीने महापुरुषांची जयंती उत्सव वैचारिक दृष्टीकोनाने साजरी केली जात आहे. महापुरुषांचे विचार समाजात घेऊन जाण्यासाठीचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. रावसाहेब काळे यांनी समाजा-समाजात व जाती-धर्मात वाद लावून सत्ता ताब्यात ठेवण्याचे षडयंत्र सुरु आहे.

ही विषमता नष्ट करण्यासाठी महापुरुषांचे अनेक वक्त्यांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र आज त्या समतेवरच घाला घालण्याचे काम सुरू आहे. बाबासाहेबांनी संविधानातून न्याय, समता, बंधुता निर्माण केली. मात्र संविधानाच धोयात आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंजि. संजय शिंदे यांनी नवीन पिढीत महापुरुषांचे विचार रुजवण्यासाठी साजरी केली जाणारी आगळीवेगळी जयंती परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचे सांगितले. कृषी अधिकारी शिरीष जाधव यांनी प्रेरणादायी जयंती उत्सवाचे कौतुक केले. शिवाजी भोसले म्हणाले की, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी एकजुटीने लढा द्यावा लागणार आहे. मूठभर लोकांच्या प्रवृत्तीमुळे विषमता निर्माण होत असून, या विरोधात महापुरुषांचे विचार दिशादर्शक ठरणार असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. रत्ना वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान व आजची परिस्थिती यावर मार्गदर्शन केले. महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने तीन दिवसीय जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (दि.११ एप्रिल) या जयंती उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. अमन बगाडे सरविचारवंतांचे व्याख्याने झाले. तर रविवारी (१४ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्याचे सादरीकरण करून कविता व भीम गीत सादर केले. तसेच यावेळी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामधील विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांचे हस्ते पुस्तकांचे बक्षीस देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. लिलाधर तुरुकमाने यांनी केले. आभार पोपट खंडागळे यांनी मानले.