राम-कृष्णाचे कनेक्शन मिळवा जीवनातील ‘सर्व चिंता’ आणि ‘सर्व भिती’ निघून जाईल : श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी

0
20

इस्कॉन मंदिरातील श्रीराम कथा महोत्सव : पुष्प चौथे

नगर – भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीराम यांचे नित्य नामस्मरण करीत त्यांच्याशी कनेशन निर्माण करा जीवनातील सर्व चिंता निघून जातील. श्रीराम कथा ध्यानपूर्वक श्रवण करा जीवनातील सर्व भिती निघून जाईल, असे श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी यांनी सांगितले. येथील पाईपलाइन रोडवरील कादंबरीनगरीत इस्कॉन मंदिरात सुरू असलेल्या श्रीराम कथा महोत्सवाचे चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठासमोर इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्रीगिरीवरधारी प्रभूजी यांच्यासह उपनगरांमधील स्त्री-पुरूष भक्तगण विराजमान झालेले होते. श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी पुढे म्हणाले, भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीराम यांच्या नामस्मरणास अनन्यसाधारण महत्व आहे, हे समजले. आमच्या घरातील सर्वांसारखा मीही डॉटर असूनही संन्यास घेण्याचा निर्णय घेत इस्कॉन मंदिराच्या नामसाधनेत दाखल झालो. भगवंताच्या दिव्य सान्निध्याचा नित्य आनंद घेताना प्रवचनामधून हाच आनंद सर्वांना वाटतो आहे. अमाप पैसा मिळवूनही जे समाधान मिळाले नसते ते समाधान आज कित्येक पटीने इस्कॉन मंदिराच्या कार्यामधून मिळते आहे. श्रीराम वनवासाला निघाले तेव्हा दुःखी होण्याऐवजी त्यांच्या चेहर्‍यावरील तेज वाढले होते. वनवासाला जाणे म्हणजे माता- पित्यांच्या आज्ञेचे पालन करणे होय, हा त्यांचा भाव तेज वाढण्यात होता. रामायणातील प्रसंगांचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यातील संदेश आजही मार्गदर्शन करतात.

राजा दशरथाला श्रीरामाचे पिता होण्याचा आणि विश्वामित्र ऋषींना त्यांचे गुरू होण्याचा मान मिळाला तो त्यांच्या अंतर्मनात असलेल्या श्रीराम भक्तीमुळेच! प्रभू श्रीरामासभोवती असलेल्या सर्वांचे चिंतन करा हे सर्व त्यांचे भक्तच होते असे लक्षात येईल. अध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रात कार्य करताना साधनेची पवित्रता असावी लागते. निरपेक्ष भाव असावा लागतो. वाणी मृदू आणि गोड असावी लागते. आपल्याकडून कोणाचेही मन दुखावले जाणार नाही, आपल्या वागण्याने कोणालाही दुःख होणार नाही याची काळजी घेणारेच अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करू शकतात. योगसाधना आणि भक्ती हे अध्यात्माचे दोन मार्ग आहेत. यामधील शक्तीशाली केवळ भक्तिमार्गच आहे, असे विश्वामित्र ऋषींनी अनुभवाने सांगितले आहे. आपले ह्रदय नेहेमी शुध्द असावे. भगवंतावर प्रेम पाहिजे. साधनेवर श्रध्दा-निष्ठा पाहिजे. सात्विक शाकाहार करीत शरिराचे पावित्र्य सांभाळले पाहिजे तेव्हाच राजीवलोचन प्रभू श्रीरामाचे आपल्या अंतरंगात दर्शन घडते. तुम्ही किती धन कमवले हे लोक पहात नाहीत तर तुमचे जीवन किती पवित्र आहे हे पहातात. सगळ्यात मोठे धन आशीर्वाद हे आहे. साधू-संतांचा, माता-पित्यांचा आशीर्वाद लाभणारे जीवनातील धन्यता अनुभवतात. मूर्ती पूजेमधून वात्सल्य भाव जागृत होऊन मन त्या देवतेशी एकरूप होवू लागते.

भगवंत दर्शनाची ओढ निर्माण होते. त्यात गुरूकृपा महत्वाची ठरते. विनम्रता जीवन सफल करते. सोन्याची लंका असलेला रावण केवळ विनम्रता नसल्याने, कोणाकडूनही समजून घेण्याची वृत्ती नसल्याने सर्वस्व गमावताना राक्षस कुलाच्या सर्वनाशास कारणीभूत ठरला. भगवंताने दिलेल्या आदेशानुसार जीवन जगू लागलो तर आपल्या जीवनाची दोरी भगवंताच्या हाती जाते. दररोज एक तास भगवंताचे नामस्मरण एका जागी बसून ठरवलेल्या वेळीच करा. जीवन भगवंतमय होईल. भगवंताच्या कथांचे श्रध्देने श्रवण केल्यास मन शुध्द होते. नातेसंबंध सुधारतात. यज्ञात जशी आहुती दिली जाते तशी भगवंताची कथा आपल्या कानात आणि ह्रदयात आहुती टाकते. प्रभू श्रीराम आपल्याला मर्यादा आणि आदर्श शिकवण्यास आले तसे भगवान श्रीकृष्ण अनुभव देण्यास आले आहेत. राक्षसांची शक्ती रात्री वाढते, हे लक्षात घेऊन प्रभू श्रीरामांनी सर्वप्रथम तारका राक्षसिनीसह तिचे पुत्र सुबाहू व मारिच यांना रात्रीच मारले. अलिकडे मोठी शहरे आणि महानगरांमधील जीवन रात्री १० नंतर सुरू होते, असे दिसून येते. हे रात्रीचे जीवन मानवासमोर अनंत अडचणी निर्माण करते आहे, या वस्तुस्थितीवर बोट ठेवत महिला, लहान मुले, गोमाता, शिक्षक आणि ज्येष्ठ मंडळी यांचा सन्मान करत राहिल्याने आपल्या कुटूंबाचा सर्वांगीण विकास घडेल, असे श्रीमान गौरांगप्रिय प्रभूजी यांनी सांगितले.