सावेडीत घरफोडी; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

0
25

नगर – नगर शहर परिसरात, विशेषतः सावेडी उपनगरात चोर्‍या, घरफोड्या यांचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी आणखी एक मोठी घरफोडी करत सोन्याचे दागिने, रोकड असा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना भूतकर वाडी परिसरातील ताठे मळ्यात घडली. याबाबत विशाल तुकाराम चव्हाण (रा. गोपालधाम सोसायटी, ताठे मळा, भूतकरवाडी) यांनी सोमवारी (दि.१५)दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय असून ते कुटुंबियांसह घराला कुलूप लावून ७ एप्रिल रोजी दुपारी बाहेरगावी गेले होते. ते पुन्हा रविवारी (दि.१४) सायंकाळी घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता सर्वत्र उचकापाचक केलेली दिसली. त्यानंतर कपाटात ठेवलेली रोकड आणि दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच तोफखान्याचे पो.नि. आनंद कोकरे, नगर शहर विभागाचे पोलिस उपअधिक्षक अमोल भारती यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत विशाल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भा.दं.वि.कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.