शहरातील सार्वजनिक स्वच्छतेच्या तक्रारींमुळे महापालिका आयुक्त सकाळीच उतरले रस्त्यावर

0
29

नगर – नगर शहर व परिसरात सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत असल्याने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.पंकज जावळे यांनी मंगळवारी (दि.१६) सकाळी अचानकपणे दुचाकीवर शहरात फेरफटका मारत शहर स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी कामचुकार पणा करणार्‍या कर्मचार्‍यांना कडक कारवाईचा इशारा देत गणवेशात नसलेल्या कर्मचार्‍यांना ५०० रुपयांचा दंड ही केला. शहरामधील रस्त्यांच्या बाजूला ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचलेले दिसत असून सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. सार्वजनिक स्वच्छतेसह कचरा संकलनही व्यवस्थित होत नसल्याने आयुक्त जावळे यांनी सकाळी अचानकपणे बुलेट मोटारसायकलवर शहरात ठिकठिकाणी फेरफटका मारला. यावेळी या पुढील काळात नगर शहरातील स्वच्छता १०० टक्के झाली पाहिजे व कचर्‍याचे संकलन करून तो कचरा देखील पूर्ण क्षमतेने उचलला गेला पाहिजे अन्यथा अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल असा कामचुकार कर्मचार्‍यांना सज्जड इशारा देत आयुक्त जावळे यांनी कारवाईचे संकेत दिले. तसेच गणवेश न वापरणार्‍या कर्मचार्‍यांना ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. यापुढील काळात देखील कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला. यावेळी आयुक्त जावळे यांनी कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरत आपल्या कामाची, जबाबदारीची जाणीव करून दिली.आयुक्त डॉ. जावळे हे दुचाकीवर स्वच्छतेची पाहणी करत असल्याची माहिती अधिकारी, कर्मचारी यांना मिळाल्यानंतर सफाई कर्मचारी ठिकठिकाणी रस्त्यावर साफसफाई करत असल्याचे दिसत होते.

जुन्या मनपा कार्यालयातील विभागांची घेतली झाडाझडती

दरम्यान डॉ. जावळे यांनी सोमवारी (दि.१५) जुन्या महापालिका परिसरातील कार्यालयांमध्ये अचानक भेट देऊन झडती घेतली. अग्निशमन विभाग आरोग्य विभाग, जन्म मृत्यू नोंदणी, वसुली, प्रभाग कार्यालय, कर मूल्य निर्धारण विभाग यासह रेकॉर्ड रूम व इतर कार्यालयांची तपासणी केली. तेथील कर्मचार्‍यांकडील कामे, हजेरी पुस्तकांची तपासणी केली. दरम्यान, जन्म व मृत्यू नोंदणी विभागातील सावळा गोंधळ, तसेच फायर ऑडिटबाबत योग्य कार्यवाही न केल्याप्रकरणी अग्निशमन विभाग प्रमुख व आरोग्य विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रशासक जावळे यांनी दिले. जुन्या महापालिकेतील जन्म मृत्यू नोंदणी विभागात गेल्या महिनाभरापासून नागरिकांची अडवणूक सुरू आहे. याबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. तेथील कर्मचारी कामावर गैरहजर असतात. दाखले देण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येते, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे प्रशासक जावळे यांनी समक्ष पाहणी करून कर्मचार्‍यांना खडेबोल सुनावले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्याकडून माहिती घेत कारवाईचे आदेश दिले. काही कर्मचारी परस्पर गैरहजर असल्याचे दिसून आले. अग्निशमन विभागात दोन कर्मचारी त्यांच्या पोशाखात नव्हते. तसेच फायर ऑडिटबाबत केवळ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापुढे कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरूनही आयुक्तांनी विभाग प्रमुख शंकर मिसाळ यांना धारेवर धरले.