नगर – संपूर्ण जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणार्या भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक (जयंती) २१ एप्रिलला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त अहमदनगर सकल जैन समाजातर्फे शहरात शोभायात्रा, चौक सजावट, रांगोळी स्पर्धा, भक्तीसंध्या अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कापडबाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी दिली. २१ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता कापड बाजार जैन मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेत सनई, नगारा, चौघडा, बॅण्ड पथक, घोडेस्वार, उंट स्वार, डोयावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले, मुली, त्यानंतर पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष व केसरी, पिवळ्या, लाल साड्या परिधान केलेल्या महिला भगिनी सहभागी होणार आहेत. भगवान महावीर स्वामींची प्रतिमा असलेले वाहन, रथ व शेवटी अनुकंपा (प्रसाद)ची गाडी असणार आहे. शोभायात्रा कापडबाजार, अर्बन बँक चौक, घुमरे गल्ली, गुजर गल्ली, आदेश्वर जैन मंदिर, लक्ष्मी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवीपेठ जैन स्थानक, घासगल्ली, महात्मा गांधी रोड, तेलीखुंट चौक, दाळमंडई, आडतेबाजार, गंजबाजार, सराफबाजार, जुना कापडबाजार, पलक ज्वेलर्स समोरून खिस्तगल्ली, बुरूडगल्ली, जुनी वसंत टॉकीज, सहकार सभागृह मार्गे धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे जाईल.
शोभायात्रेनंतर आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज, प्रबुध्द विचार आदर्शऋषीजी महाराज, संस्कारप्रेमी अलोकऋषीजी महाराज, साध्वीजी भगवंत महाराष्ट्र प्रवर्तिनी डॉ. ज्ञानप्रभाजी म.सा., साध्वीरत्ना पुष्पाकंवरजी, त्रिशलाकंवरजी म.सा., सत्यप्रभाजी म.सा., विश्वदर्शनाजी म.सा., प्रीतीदर्शनाजी म.सा., विचक्षणाजी म.सा., आराधनाजी म.सा., मंगलप्रभाजी म.सा., जैन मंदिर येथे वास्तव्यास असलेल्या साध्वीजी भगवंत स्नेहझरा म.सा. आदी ठाणा ३ आदी साधू साधूसाध्वीजींच्या उपस्थितीत भगवान महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर प्रवचन तथा गुणानुवाद होईल. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली आहे. महावीर जयंतीनिमित्त नगर शहरात चौक सजावट स्पर्धाही होणार आहे. याशिवाय रांगोळी स्पर्धाही होणार आहे. यात प्रथम बक्षिस ११०० रुपये, व्दितीय बक्षिस ९०० रुपये, तृतीय बक्षिस ७०० रुपये व ३०० रुपयांची सहा उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहे. इच्छुकांनी आपली नाव नोंदणी कापडबाजार जैन मंदिरात करायची आहे. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण सौ.शैला गांधी व सौ. सरोज कटारिया करणार आहेत. शोभायात्रेत सुरूवातीपासून शेवटपर्यंत सहभागी होणार्या भाविकांसाठी प्रमुख मार्गावर तीन ठिकाणी लकी ड्रॉ कुपनचे आयोजन करण्यात आले आहे. यातील भाग्यवान विजेत्यांना प्रथम बक्षिस ३०० रुपये, व्दितीय बक्षिस २०० रुपये तर तृतीय बक्षिस १०० रुपये देण्यात येईल. डोयावर कलश (घडा) घेणार्या लहान मुलींसाठीही बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. जैन बांधवांनी यादिवशी आपल्या घरावर जैन ध्वज लावून घरासमोर रांगोळी काढून शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जैन ध्वज कापडबाजार जैन मंदिरात मोफत उपलब्ध आहे. चौक सजावट स्पर्धेत प्रथम बक्षिस ३१०० रुपये, व्दितीय बक्षिस २१०० रुपये, तृतीय बक्षिस १५०० रूपये असेल तसेच ३ उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी ७०० रुपये देण्यात येतील. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता आनंदधामच्या प्रांगणात जैन सोशल फेडरेशनतर्फे भक्तीसंध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
इंदोर येथील डॉ.श्रद्धा जगताप व सृष्टी जगताप भक्ती संध्या कार्यक्रम सादर करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, बडी साजनचे अध्यक्ष प्रेमराज बोथरा, धार्मिक परीक्षा बोर्डचे सेक्रेटरी संतोष बोथरा, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा, डॉ.प्रकाश कांकरिया, माणिकनगर जैन मंदिराचे अशोक मुथा व तलकशीभाई सावला, दिगंबर जैन समाजाचे महावीर बडजाते, नरेंद्र लोहाडे, अॅड. संतोष भोसे, संजय महाजन, महावीर गोसावी, जैन गुजराथी समाजाचे अध्यक्ष डॉ. विनयभाई शहा, एच.व्ही.शहा, कमलेशभाई गांधी, मयुरभाई मेहता, वात्सल्य संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, महावीरनगर श्री संघाचे अध्यक्ष अनिल कटारिया, केडगावचे पोपटलाल शिंगी, आगरकर मळा श्री संघाचे उपाध्यक्ष सुरेश पगारिया, सेक्रेटरी अभय कोठारी, विनायकनगर श्री संघाचे अध्यक्ष किशोर पितळे, सावेडीचे अध्यक्ष जवाहरलाल कटारिया व शांतीलाल बोरा, सिव्हिल हडको जैन मंदिराचे अध्यक्ष प्रफुलभाई मेहता, सी.ए.राजेशभाई शहा, सिव्हिल हडको श्रावक संघाचे विजय गुगळे, धार्मिक परीक्षा बोर्डचे उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, सेक्रेटरी संतोष गांधी, मर्चंट बँकेच्या संचालिका मिनाताई मुनोत व प्रमिलाताई बोरा, जैन सोशल फेडरेशनचे सचिन डुंगरवाल, महेश भळगट, सिमंधर स्वामी भक्त मंडळ, कापड बाजार जैन मंदिर ट्रस्टी मंडळ, भिंगार, केडगाव, सावेडी व सर्व उपनगर, नगरमधील भारतीय जैन संघटना, जैन सोशल फेडरेशन व सकल जैन संघाच्या पदाधिकार्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे चौक सजावट, रांगोळी स्पर्धा, लकी ड्रॉ विजेते, लहान मुला मुलींची बक्षिसे आनंदधाम येथील कार्यक्रमात देण्यात येतील अशी माहिती जैन मंदिरचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी दिली. प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी म.सा. यांच्या उपस्थितीत झालेल्या सकल जैन समाजाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मिरवणूक मार्गावर सरबत, ताक, गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट व इतर खाद्य पदार्थ न वाटता ते धार्मिक परीक्षा बोर्ड परिसरात स्टॉल लावून देण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.