ज्या घरात कोणाच्याही भ्रमणध्वनीला कुलूप नसते ते घर म्हणजे ‘अयोध्या’ : श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी

0
17

इस्कॉन मंदिरातील श्रीराम कथा महोत्सव : पुष्प दुसरे

नगर – प्रभू श्रीरामांच्या प्रगट होण्याअगोदर अयोध्यानगरी सुरक्षित होती. सूक्ष्म तत्त्वांचेही संरक्षण या नगरीत होत होते. कोणतेही नैसर्गिक संकट अयोध्येवर येत नव्हते. या नगरीत घराला कुलूप नसायची कारण चोरी होतच नव्हती. आज एका घरात रहाणार्‍या चार जणांच्याही भ्रमणध्वनीला कुलूप असते. ज्या घरात कोणाच्याही भ्रमणध्वनीला कुलूप नसते ते घर अयोध्या होय, असे श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी यांनी सांगितले. येथील पाईपलाइन रोडवरील कादंबरीनगरीत इस्कॉन मंदिरात सुरू असलेल्या श्रीराम कथा महोत्सवाचे व्दितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठासमोर इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्रीगिरीवरधारी प्रभूजी यांच्यासह स्त्री-पुरूष भक्तगण मोठ्या संख्येने विराजमान झालेले होते. लहान मुलांचीही लक्षणिय उपस्थिती होती. श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी पुढे म्हणाले, रामायण उत्तम भक्तांची, भक्तांच्या तपश्चर्येची कथा आहे. सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, जटायू, बिभिषण, शबरी आदी उत्तम भक्तांची श्रध्दा आणि उत्तम भावना रामायणातील कथांमधून समोर येते. रामायणात भक्तांच्या समर्पणाच्या कथा आहेत. त्यागाच्या परिसिमा असलेल्या कथा आहेत. या अद् भूत भक्तांच्या कथा ऐकताना ह्रदयात भक्तिभाव उत्पन्न होतात. भक्तांच्या सद् गुणांच्या कथा ऐकताना नातेसंबंध कसे असावे? कसे जपावे? हे कळते. अयोध्येमध्ये येऊन लव आणि कुश जेव्हा रामायण गाऊ लागले तेव्हा स्वतः प्रभू श्रीराम आपले सिंहासन सोडून त्यांच्याजवळ येऊन बसले.

कथा ऐकण्याचा आनंद सर्वाधिक असतो तसेच कथा श्रवण करताना त्यात रममाण कसे व्हावे? हे श्रीरामांनी स्वकृतीमधून दाखवून दिले. प्रभू श्रीराम हे करूणा आणि सीतामाई शक्ती आहे. या दोघांचा विवाह म्हणजे करूणा आणि शक्तीचा विवाह होय. वैदिक सनातन समाजात चरित्र आणि शिष्टाचारानेच व्यक्ती उत्तम मानला जातो. व्यक्तीकडे किती ज्ञान आहे यापेक्षा त्याने आपल्या ज्ञानामधून परिवर्तन किती केले? हे महत्वाचे मानले जाते. फ्लॅट संस्कृतीत रहाणारे आपल्या कुटूंबापुरतातय्फ्लॅट पुरताच विचार करतात. संपूर्ण अपार्टमेंटचा विचार करणे सुरू झाले की समाजाचा विचार करणे सुरू होते. यामधून सेवाभाव जागृत होतो. हा सेवाभाव निरपेक्ष असला की अंतःकरणात कोमल भावना प्रगट होवून भगवंताकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो. भगवंताचे गुणगाण गाताना भगवंतस्वरूप झाल्याचा शाश्वत आनंद मिळवता येतो. याकरिता श्रध्दा आणि विश्वास दृढ असणे आवश्यक ठरते, असे श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी यांनी सांगितले. अनेकविध सिध्दांत मांडत श्रीरामायण कथेतील प्रसंग डोळ्यांसमोर उभे करताना त्यातील बारकावे दाखवून देण्याची श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी यांची वत्कृत्व शैली श्रोत्यांना राममय व्हावयास लावते आहे. कथा महोत्सवास मिळणारी गायनाची आणि वादनाची सुरेल साथ भक्तांना देहभान हरपण्याचा आनंद देत असल्याचे दिसून येत आहे.