मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
24

विषारी दारू पिल्याने लोकांचे मृत्यू का होतात?

सूरा पिऊन दिल्लीत शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. मुंबईतही विषारी दारूमुळे लोक बळी पडले. अधूनमधून वृत्तपत्रात विषारी दारूच्या बातम्या येतच असतात. विषारी दारू म्हणजे काय व ती पिल्याने लोक का मरतात, ते आता पाहू. सामान्यपणे ज्या दारूचा पिण्यासाठी उपयोग केला जातो, त्यात एथाईल अल्कोहोल असते. दारूमुळे व्यसन लागते व इतर अनेक तोटे होतात. नशा येते, अपघात होऊ शकतात व गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतात. हे खरे असले तरी, रक्तातील एथाईल अल्कोहोलचे प्रमाण जोपर्यंत दर शंभर मि.ली.त ४०० ते ५०० मि.ग्रॅ. इतके वा त्याहून जास्त होत नाही, तोपर्यंत मृत्यू येण्याची शयता कमी असते. याउलट विषारी दारू अल्प प्रमाणात प्यायली तरी मृत्यू येतो. विषारी दारू म्हणजे मिथाईल अल्कोहोल. मळी वा लाकडाच्या विघटनापासून हे अल्कोहोल तयार होते. वैद्यकशास्त्रात वापरल्या जाणार्‍या स्पिरीटचा कोणी पिण्यासाठी वापर करू नये, म्हणून त्यात मिथाईल अल्कोहोल टाकतात. तरीही मद्यपी स्पिरीटही पिण्यासाठी वापरतात व विषबाधा होते. मिथाईल अल्कोहोल ६० ते २४० मि.ली. इतके पिल्यास प्रौढांचा खात्रीने मृत्यू होतो. २४ ते ३६ तासांत व्यक्ती मृत्यूमुखी पडते. मिथाईल अल्कोहोल शरीरातून फार संथगतीने उत्सर्जित केले जाते. त्याचे चयापचय होऊन फॉर्मिल्डिहाईड व फॉर्मिक अ‍ॅसिड हे विषारी पदार्थ तयार होतात. या विषारी पदार्थांमुळेच विषबाधेची लक्षणे दिसतात. विषारी दारू प्यायल्यानंतर सुरुवातीला डोके दुखते, चक्कर येते, मळमळ व उलट्या होतात; तसेच पोटात दुखते. नंतर स्नायूंमध्ये शक्ती राहत नाही व हृदयाचे कार्यही मंदावते. डोळ्यांवर फारच विपरीत परिणाम होतात. काही वेळा तात्पुरते अंधत्व येते; पण दृष्टीसाठी आवश्यक असणारे चेतातंतू नष्ट झाल्यास वा निकामी झाल्यास कायमचे अंधत्वही येते. नंतर व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. या विषबाधेमध्ये डायलिसीसचा वापर करून रोग्याचे प्राण वाचवता येतात. इतर उपचार लक्षणांवर आधारित असे असतात. दारू पिणे वाईटच, पण त्यातही स्वस्त मिळते म्हणून कोणतीही दारू पिणे अतिशय वाईट. कारण अशा दारूत मिथाईल अल्कोहोल असू शकते व त्यामुळे जीवदेखील जाऊ शकतो.