पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी वांबोरी घाटातील नैसर्गिक पाणवठा टँकरने पाणी आणून भरला

0
24

नगर – उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे या पाणवठ्यावर तहान भागवण्यासाठी येणारे वन्यजीव, पक्षी यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. नगरजवळील वांबोरी घाट, डोंगरगण परिसरातील नैसर्गिक दरीमध्ये असणारा पाणवठा कोरडा पडला होता. त्यामुळे सतरंग फौंडेशन आणि हिमसह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने या पाणवठ्यात टँकरने पाणी सोडून पाणवठा भरण्यात आला. पाणी येताच परिसर पुन्हा एकदा पक्षांच्या किलबिलाटाने प्रफुल्लित झाला. छाया खर्डे, स्वाती चंगेडीया, रवी राठोड, अभिजित दहातोंडे, मयुर राहिंज, निसर्ग भ्रमंती ग्रुपचे डॉ. अभिजित होशिंग, रामभाऊ जगताप, दिनेश राऊत, निशिकांत महाजन, नितीन केदारी, प्रसाद खटावकर, धीरज खिस्ती, विनायक कुलथे, प्रशांत पठारे, विद्यासागर पेटकर, वनविभागाचे श्री. दाणी मामा, स्थानिक नवनाथ ससे, बर्डे, सतिष कदम व इतर ग्रुपचे सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी डोंगरगण येथील जैवविविधता उद्यानालाही भेट दिली. छाया खर्डे म्हणाल्या, निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होणे सगळ्यांनाच आवडते. त्याचवेळी या निसर्गाचा भाग असलेले, तेथील नैसर्गिक जलस्त्रोतावर अवलंबून असलेल्या पशुपक्ष्यांचीही काळजी आपण घेतली पाहिजे. उन्हाळ्यात गावोगावी टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्याच धर्तीवर हा नैसर्गिक पाणवठा टँकरने पाणी आणून भरला आहे. त्यामुळे या परिसरातील पशुपक्ष्यांची तहान भागणार आहे.