भर उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची होतेयं भटकंती

0
13

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराईचा धोका, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

नगर – मुकुंदनगर येथील गोविंदपुरा भागातील बडी मरियम मशिदच्या मागील गल्लीमध्ये गेल्या आठ दिवसापासून नळाला पाणी न आल्याने नागरिकांवर भर उन्हात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. तसेच याच परिसरात घरांसमोर ड्रनेजचे पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्नही उभा ठाकला आहे. ऐन रमजान महिन्यातच नागरिकांना महीनाभरा पासून या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. शहरातील गोविंदपुरा भागातील बडी मरियम मशिदच्या मागील गल्लीमध्ये नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. रमजानसारखा सणसुध्दा विना पाण्याचे साजरा करावा लागला. या परिसरातील नागरिकांना भर उन्हाळ्यामध्ये महिन्याभरापासुन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या गल्ली समोरील शेजारच्या गल्लीमध्ये महानगरपालिकेने सिमेंटचा रस्ता केला आहे. हा रस्ता करताना ठेकेदाराने भूमिगत गटारीचे चेंबरच बंद करून टाकले आहे. त्यामुळे मैलामिश्रित पाणी दारात साचले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता त्यानंतर तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याने येऊन पाहणी केली आणि आजच तुम्हाला पाणी येईल, असे आश्वासन दिले. परंतु अद्यापपर्यंत पाणी मिळालेच नाही. मरियम मशिदच्या मागील गल्लीमधील नागरिकांचे नळजोड तोडून टाकले आहेत. यामुळे येथील घरांना गेल्या आठ दिवसांपासून पाणी आले नाही. या सर्व समस्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासन व नगरसेवकांबद्दल मोठी नाराजी पसरलेली आहे. त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिक कधीही आंदोलनाच्या तयारीत आहे.