मूकबधिर विद्यार्थ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा : आ. संग्राम जगताप

0
49

राष्ट्रवादी ओबीसीतर्फे मूकबधिर विद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची दंत तपासणी 

नगर – बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क आणि अधिकार मिळावा म्हणून क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाईंनी घेतलेले कष्ट महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या त्यागामुळेच बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडे खुली झाली. मूकबधिर विद्यार्थ्यांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. दंत तपासणी व फळ वाटप करुन त्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागातर्फे नगर शहरातील टिळक रोड वरील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयातील २५ मुलांची दंत तपासणी करून व आ. संग्राम जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. डॉ. अतुल मडावी यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिक विधाते, संजय सपकाळ, सुरेश बनसोडे, जय सपकाळ, केतन क्षीरसागर, शरद दातरंगे, भरत गारुडकर, लहू कराळे, तुषार टाक, मुख्याध्यापक विजय आरोटे, संतोष यादव, अनिल हिवाळे, एस. एम. कर्पे, शिवाजी विधाते, ज्ञानेश्वर रासकर, राहुल रासकर, रोहित पडोळे, शुभम आंबेकर, गणेश पांढरे, रोहित इवळे, मयूर जाधव आदी उपस्थित होते. डॉ. मडावी म्हणाले, शालेय जीवनातच दंतविकार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास दातांचे आजार वाढतात. पूर्वीच्या तुलनेत दंतविकारांचे प्रमाण शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुप्पट ते तिप्पट आढळून येत आहे. योग्य वेळी निदान व्हावे, यासाठी नियमित दंत तपासणी गरजेचे आहे. मुलांच्या दातांची तपासणी करून, पुढील औषधोपचाराची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या रुग्णालयात येण्याचे आवाहन केले.

महात्मा फुले यांचे कार्य वैश्विक

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर म्हणाले, थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. महात्मा फुले यांचे विचार लोकांना सामर्थ्य देतात. शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अविश्रांत प्रयत्नामुळे समाजावर ठसा उमटला आहे. ते वैश्विक तत्वचिंतक, विचारवंत आहेत. त्यांचे कार्य वैश्विक आहे. त्यांच्या सामाजिक कार्यापासूनच प्रेरणा घेत आज मूकबधिर विद्यार्थ्यांची दंत तपासणी व फळ वाटप करण्यात आले.