गावठी कट्‌ट्यासह तरुणाला पोलिसांनी हॉटेलमध्ये पकडले

0
38

गावठी कट्ट्याासह ३ जिवंत काडतुसे केली जप्त; एलसीबीची कारवाई

नगर – कमरेला गावठी कट्टा लावून वावरणार्‍या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. त्याच्या कडून गावठी कट्टयासह ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. नगर तालुयातील वाटेफळ शिवारात असलेल्या हॉटेल निसर्ग येथे ही कारवाई करण्यात आली. लोकसभा निवडणुकी अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांना नगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पो.नि.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, रविंद्र कर्डीले, मयुर दिपक गायकवाड, विशाल आण्णासाहेब तनपुरे, संतोष खैरे यांचे पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते. सदर पथक अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाटेफळ शिवारातील हॉटेल निसर्ग या ठिकाणी एका इसमाकडे गावठी कट्टा आहे. ही माहिती मिळताच या पथकाने तातडीने तेथे धाव घेत शहाजी निवृत्ती जाधव (वय ३९, रा. राजेगांव, ता. केज, जि. बीड, हल्ली रा. हॉटेल निसर्ग, वाटेफळ, ता. नगर) यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ १ गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसे मिळून आली. पथकाने ती जप्त करत त्याच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.