प्रयास ग्रुप सावेडी शाखेच्या अध्यक्षपदी कुसुमसिंग यांची निवड

0
25

गुढी पाडव्यानिमित्त सोडत काढून भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वाटप

नगर – महिला सक्षमीकरणासह महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी मागील पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या प्रयास ग्रुप सावेडी शाखेच्या अध्यक्षपदी कुसुमसिंग यांची निवड करण्यात आली. तर सावेडी भागातील महिलांसाठी पौष्टिक व सकस आहाराच्या रेसीपीचा समावेश असलेल्या पाककला वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. पाककला वर्गाला महिलांचा प्रतिसाद लाभला. गुलमोहर रोड, येथील कमलाबाई नवले सभागृहात हा कार्यक्रम रंगला होता. कुसुमसिंग यांची निवड झाल्याबद्दल दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपाध्यक्षा कविता दरंदले, दादी नानी ग्रुपचे सचिव शकुंतला जाधव, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सचिव अ‍ॅड. ज्योत्स्ना कुलकर्णी, विद्या बडवे, शशिकला झरेकर, शोभा कानडे, सुजाता पुजारी, वंदना गोसावी, सुरेखा बारस्कर, स्मिता वाल्हेकर आदी उपस्थित होत्या. कुसुमसिंग म्हणाल्या की, महिलांनी महिलांना आधार दिल्यास अनेक प्रश्न सुटणार आहे. प्रयास ग्रुपच्या माध्यमातून सावेडी मधील महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवून प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे.

महिलांचा सर्वांगीन विकास व आरोग्याबरोबर जीवनात आनंद निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलका मुंदडा यांनी सावेडी येथील महिलांना प्रयासच्या विविध उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाखेची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगितले. गुढी पाडव्यानिमित्त सोडत काढून भाग्यवान विजेत्या महिलांना बक्षीस देण्यात आले. यामध्ये रजनी भंडारी, कविता दरंदले, मीनाक्षी पळसकर, भारती भंडारी, आशा कटारिया यांना बक्षीसे मिळाली. दिपाली बिहाणी यांनी उत्तम आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करीत, पौष्टिक व सकस आहाराच्या विविध रेसीपी प्रात्यक्षिकासह सांगितल्या. तसेच महिलांसाठी मेघना मुनोत यांनी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेतल्या. यामधील विजेत्यांना देखील बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या बडवे यांनी केले. आभार ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राखी जाधव यांनी परिश्रम घेतले.